निवृत्त सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी अर्धवट माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले असून, उलट आपण घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात भर पडली होती, असा दावा करीत माजी वित्तमंत्री व राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर लॉटरी घोटाळ्याच्या संदर्भात करण्यात आलेले सारे आरोप मंगळवारी फेटाळून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य विधानसभेत आनंद कुलकर्णी यांनी केलेल्या गैरकृत्यांचा पाढा वाचून दाखविल्याने चिडून त्यांनी आपल्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. परदेशातून परतल्यावर सारी माहिती गोळा जमा करून पाटील यांनी पत्रकार परिषदेत बाजू मांडली. आपण घेतलेल्या निर्णयांमुळे सरकारचे तीन लाख कोटींचे नुकसान झाल्याचा शोध या कुलकर्णी महाशयांनी लावला आहे. पण लॉटरीवर कर लावल्याने राज्य शासनाला गेल्या नऊ वर्षांत सुमारे ८०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. कुलकर्णी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून आरोप केले आहेत. त्यांचा बोलविता धनी कोणी तरी वेगळा असावा किंवा त्यांना निवृत्तीनंतर सरकारकडून काही पदाची अपेक्षा असावी, असे पाटील यांनी सांगितले. कुलकर्णी यांच्या विरोधात बरीच माहिती जमा झाली आहे. त्यांनी मंत्रालयात काय गोंधळ घातला हे सारे प्रसंगी विधानसभेत मांडेन, असा इशाराही पाटील यांनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil refused to all charges in lottery scam
First published on: 06-07-2016 at 03:53 IST