दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर बोलणी सुरू आहेत. त्यामुळे किती दिवस राष्ट्रवादी आमच्याबरोबर राहील हे माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकात प्रचारावेळी बोलताना म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“कर्नाटकात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला आहे. अशी कोणतीही चर्चा कोणत्याही पक्षाबरोबर करण्याचा प्रश्नच नाही. कारण, निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. आम्ही निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जण काम सुरू करतोय. त्यामुळे अशा प्रकाराची चर्चा करणे म्हणजे, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी खडसावले आहे.
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपाबरोबर जाण्यासाठी दबाव असल्याने शरद पवारांनी निवृत्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटले, “अशा चर्चा सुरू असतात. तेवढ्यासाठी शरद पवार एवढा मोठा निर्णय घेतील असे वाटत नाही. पण, अशा चर्चांबद्दल मला माहिती नाही.”
हेही वाचा : अजित पवार की सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले…
नेमके काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
“काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जनता दलाला ( धर्मनिरपेक्षक ) रसद पुरवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. त्यात राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्याबरोबर आहे. ते किती दिवस आमच्याबरोबर राहतील ते माहीत नाही. कारण, भाजपाबरोबर त्यांची रोज बोलणी सुरू आहेत,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.