राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी बीडमध्ये हिंदू देवस्थानच्या जमिनी पडप करण्याचे प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच हा घोटाळा उघड करणाऱ्या तक्रारदाराविरोधात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. जयंत पाटील बुधवारी (८ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान अशा हिंदू देवांच्या मंदिराच्या ट्रस्टची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार झाला आहे. हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पिंपळेश्वर महादेव ट्रस्टमध्ये एका दुधसंघाच्या कर्मचाऱ्याच्या नावाने ५०-६० एकर जमीन आहे. विठोबा देवस्थानाची जमीन मनोज रत्नपारखे या व्यक्तीच्या नावावर आहे. रामचंद्र देवस्थानची जमीन रोहित जोशी यांच्या नावावर वर्ग झाली.”
“देवस्थानांच्या जमिनी हडप केल्याची तक्रार देणाऱ्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल”
“सरकार बदलल्यावर तक्रारदाराचं निशुल्क संरक्षण काढून टाकण्यात आलं. तसेच तक्रारदारावर अहमदनगरमध्ये पॉक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे तक्रारदाराला संरक्षण देण्याचं राहिलं, त्याचं संरक्षण काढण्यात आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातून तक्रारदाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
“देवस्थान जमीन घोटाळाप्रकरणी आरोपींविरोधात कोणती कारवाई केली?”
जयंत पाटील पुढे म्हणाले, “हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस, भ्रष्टाचार विरोधी विभाग वेळकाढूपणा करत आहे. हे प्रकरण पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी केली आहे का? आरोपींविरोधात तपास अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली?”
“फडणवीस हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणाऱ्यांना किती दिवसात अटक करणार?”
“तक्रारदाराने धाडस दाखवून तक्रार केली. त्यामुळे त्याला संरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीसही मान्य करतात. त्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करणाऱ्याला योग्य प्रायश्चित देणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळतील, असं मला वाटत नाही. जो गुन्हेगार असेल त्याचा पिच्छा पुरवण्याचं काम ते करतील का? किती महिन्यात गुन्हेगारांना अटक होईल? आणि राज्य सरकार किती दिवसात हडप केलेल्या हिंदू देवस्थानच्या जमिनी परत देवस्थांनांना मिळवून देईल?” असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.