एक्स्प्रेस वृत्त
मुंबई : ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची (आयआयटी) पदवी अभ्यासक्रमाच्या संयुक्त प्रवेश परीक्षा-‘जेईई अॅडव्हान्स्ड’चा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये सर्व श्रेणींमध्ये ‘कट-ऑफ’ टक्केवारी लक्षणीयरित्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व सात विभागांतील पहिल्या ५०० उमेदवारांमध्ये हैदराबाद विभागातील सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे.
या वर्षी आयआयटींमध्ये प्रवेश घेण्यासाठी १,८०,३७२ उमेदवारांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी ४३,७७३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये हैदराबाद विभागाचा व्ही. चिद्विलास रेड्डी हा ३६० पैकी ३४१ गुण मिळवून देशात पहिला आला, तर याच विभागाची नायाकांती नागा भाव्याश्री २९८ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम आली. सर्वसाधारण गुणानुक्रम यादीसाठी (सीआरएल) गेल्या वर्षीचा कट ऑफ १५.२८ टक्के होता, यंदा त्याने २३.८९ टक्क्यांवर झेप घेतली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण आर्थिक दुर्बल गट (ईडब्ल्यूएस), इतर मागासवर्ग (ओबीसी), अनुसुचित जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) या प्रवर्गाच्या कट ऑफमध्येही गेल्या वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. यंदा निगेटिव्ह मार्किंगची टक्केवारी कमी झाली.
त्यामुळे उमेदवारांना अधिक गुण मिळाले, परिणामी कट-ऑफ वाढले, असे जेईई अॅडव्हान्स्डचे संयोजक अध्यक्ष प्रा. बिष्णुपद मंडल यांनी स्पष्ट केले.
आयआयटी मुंबई विभागात पहिल्या पाच स्थानी शंकर, युवराज गुप्ता, चैतन्य माहेश्वरी, जस्त्य जरीवाला, सुमेध एस एस यांचा समावेश आहे. मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळवला आहे.