अपंग विद्यार्थी प्रवर्गात उणे ३५ गुण मिळालेले विद्यार्थीही पात्र
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतील जागा वाढल्या असल्या तरी प्रवेशाकरिता होणाऱ्या सामाईक चाचणी परीक्षेच्या (जेईई-मेन्स) गुणांचा ‘कटऑफ’ यंदा चांगलाच घसरला आहे. आयआयटीसह एनआयटी, ट्रिपल आयटी यांसारख्या केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी झालेल्या या परीक्षेत अपंग प्रवर्गातून उणे ३५ गुण मिळालेले विद्यार्थीही पुढील टप्प्याच्या ‘अॅडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. केवळ अपंगच नव्हे तर इतरही सर्व प्रवर्गाच्या गुणांच्या पातळीत यंदा मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे.
एकेका गुणाची स्पर्धा करीत विद्यार्थी आयआयटीतील प्रवेशांचे टप्पे पार करत असतात. त्यासाठी पहिल्या टप्प्यावर जेईई-मेन्स (मुख्य) ही परीक्षा होते. मेन्समध्ये पात्र ठरलेल्यांची जेईई-अॅडव्हान्स ही परीक्षा होऊन या गुणांआधारे विद्यार्थी प्रवेशाकरिता पात्र ठरविले जातात. या वेळी जेईई-मेन्सच्या किमान पात्रता गुणांची (कटऑफ) घसरण झाल्याचे दिसत आहे. सर्वच प्रवर्गाच्या गुणांमध्ये घसरण झाली आहे. यात सर्वाधिक घसरण अपंग प्रवर्गाची आहे. अपंग विद्यार्थ्यांच्या किमान गुणांची पातळी ही उणे ३५ गुणांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षेत उणे गुण मिळालेले विद्यार्थीही यंदा आयआयटी, एनआयटीमध्ये दिसू शकतील.
प्रवेशावर परिणाम कसा?
मुख्य परीक्षेत उणे गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरले तरी आयआयटीतील प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना अॅडव्हान्समध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल. मात्र एनआयटी, ट्रिपल आयटी या केंद्रीय संस्थांमधील प्रवेश जेईई मुख्य परीक्षेच्या आधारे करण्यात येतात. या संस्थांमध्येही अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे आयआयटीतील प्रवेशावर या गुणांचा परिणाम फारसा झाला नाही तरीही बाकी संस्थांमध्ये हा परिणाम दिसू शकतो अथवा या संस्थांमध्ये जागा रिक्त राहू शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
उणे गुण कसे?
- जेईई-मेन्स परीक्षा ३६० गुणांची असते. या परीक्षेसाठी उणे मूल्यांकन असून योग्य उत्तरासाठी ४ गुण दिले जातात तर चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कापला जातो. आयआयटीतील प्रवेशासाठी एकूण प्रवेशक्षमतेच्या काही पट विद्यार्थ्यांची मेन्समधून अॅडव्हान्स परीक्षेसाठी निवड केली जाते. प्रत्यक्ष प्रवेश मात्र अॅडव्हान्स परीक्षेतील गुणांनुसार ठरतो.
- यंदा अॅडव्हान्ससाठी २ हजार ७५५ विद्यार्थी हा अपंगांसाठीचा कोटा आहे. त्यामुळे उत्तीर्ण अपंग विद्यार्थ्यांपैकी २ हजार ७५५ विद्यार्थ्यांची निवड अॅडव्हान्ससाठी करणे भाग होते. ती करताना गुणांची कटऑफ खाली आणावी लागली आहे. त्यामुळे प्रवेशपात्र ठरलेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांचा कटऑफ उणे ३५ गुण इतका घसरला आहे.
अनेक केंद्रीय संस्थांमध्ये जेईई मुख्य परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्यात येतात. तेथे घसरलेल्या या गुणवत्तेचा परिणाम यंदा दिसू शकेल. राज्यांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही अखिल भारतीय कोटय़ातील प्रवेशासाठीही जेईई मुख्य परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्यात येतात. मात्र तेथे हा प्रश्न येणार नाही. मात्र या सगळ्याबाबत व्यवस्थेने विचार करून किमान गुणवत्तेच्या निकषांबाबत विचार करण्याचीही आवश्यकता आहे.
– दुर्गेश मंगेशकर, प्रवेश परीक्षातज्ज्ञ (आयआयटी प्रतिष्ठान)