सागरी धोक्यांची संख्या कमी असतानाही भारतीय नौदलाच्या ताफ्यात कमीतकमी २४ पाणबुडय़ा असाव्यात, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र सध्या आपल्याजवळ केवळ १४ पाणबुडय़ाच आहेत. तसेच जुन्या पाणबुडय़ांचा कार्यकाल संपत असल्यामुळे नौदलाची क्षमता घटण्याची भीती आहे. सिंधुरक्षक पाणबुडीतील स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर या गंभीर विषयाचा घेतलेला वेध..
या वर्षांत भारतीय नौदलासाठी काही चांगल्या घटना घडल्या. त्यामध्ये काही दिवसांपूर्वीच स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे थाटात जलावतरण झाले. त्यानंतर आता डिसेंबरमध्ये विमानवाहू ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही युद्धनौकाही नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. एकूणच नौदलाचा उत्साह वाढवणाऱ्या अशा गोष्टी घडत असतानाच बुधवारी मुंबई येथे ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या पाणबुडीत प्रचंड स्फोट झाला आणि साऱ्या उत्साहावर पाणी पडले. नौदलासाठी हा खूपच मोठा आघात आहे.
आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीतील स्फोट हा तांत्रिक कारणांमुळे झाला की निष्काळजीपणामुळे झाला हे पुढे होणाऱ्या चौकशीतून स्पष्ट होईलच. मात्र या दुर्घटनेमुळे सध्या नौदलाकडे असलेल्या किलो वर्गाच्या रशियन पाणबुडय़ांबाबत सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंतचे संरक्षणविषयक अनेक अहवाल, अंतर्गत मूल्यमापन आणि युद्धसराव यातून भारतीय नौदलाची सर्वात मोठी चिंता समोर आली. ती चिंता म्हणजे पाणबुडय़ांची कमतरता.
भारतीय नौदलाच्या दृष्टीने विचार करता गेल्या शतकात सागरी धोक्यांची संख्या कमी असतानाही कमीतकमी २४ पाणबुडय़ा भारताकडे असाव्यात, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र असे असताना सध्या आपल्याजवळ केवळ १४ पाणबुडय़ाच आहेत. त्यातही दोन पाणबुडय़ा दुरुस्तीसाठी गोदीत पडून आहेत. तर एक आयएनएस सिंधुरक्षक मंगळवारी स्फोटात नष्ट झाली.
आपल्याकडील काही पाणबुडय़ांचे आयुष्य संपत आल्याने त्यामध्ये सुधारणा करून त्या आणखी १५ वर्षे सेवा देऊ शकतील, अशी तरतूद करण्यात आली. मात्र असे असले तरी जुन्या पाणबुडय़ांचा कार्यकाल संपत असल्यामुळे नौदलाची क्षमता घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
भारताचे नौदल सामथ्र्य वाढविणारी आयएनएस विक्रांत २०१८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होईल. तर आयएनएस विक्रमादित्य यंदाच कार्यान्वित होईल. या दोन विमानवाहू युद्धनौकांमुळे आपले सामथ्र्य कैकपटींनी वाढणार आहे. मात्र असे असले तरी भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता पाण्याखालूनही सुरक्षितता मिळविण्यासाठी अधिक पाणबुडय़ांची गरज भारताला आहे. या दशकात दोन विमानवाहू युद्धनौका, विनाशिकांचा एक संच व काही लढाऊ जहाजे भारतीय नौदलात सामील होणार आहेत. मात्र सागरावरील युद्धनौका व पाण्याखाली काम करणाऱ्या पाणबुडय़ा यांचा आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत मेळ बसत नसल्याचे दिसून येते. कारण २०१० मध्ये भारतीय नौदलाकडे १६ पाणबुडय़ांची क्षमता होती ती आता १४ झाली आहे. त्यातही आता ‘किलो वर्गातील’ पाणबुडय़ांची विस्तारित सेवाही संपत आली असून २०१७ मध्ये तीन पाणबुडय़ा सेवेतून बाद होणार आहेत. त्याच वर्षी काही पाणबुडय़ा मिळणार असल्यामुळे नौदलाला थोडासा दिलासा मिळेल.
पाणबुडय़ांची संख्या वाढण्यावर मर्यादा येण्यामागील कारणे म्हणजे जर्मनीकडून मिळणाऱ्या ‘एचडीडब्लू’ या पाणबुडय़ा खरेदीतील गैरव्यवहार आणि त्याचा योग्य पाठपुरावा न केल्यामुळे खोळंबल्या आहेत. त्याचप्रमाणे स्कॉर्पिअन पाणबुडय़ांच्या निर्मितीसही विलंब होत असून त्या मिळण्यास आणखी पाच वर्षे लागण्याची शक्यता आहे. स्कॉर्पिअन पाणबुडय़ांचा पहिला करार २००५ मध्ये झाला. त्या २०१२ मध्ये मिळणे अपेक्षित होते. पण माझगाव गोदीतील काही विलंबामुळे या पाणबुडय़ा २०१७ पर्यंत तरी मिळतील, अशी शक्यता दिसत नाही. याशिवाय पारंपरिक पद्धतीच्या नवीन पाणबुडय़ा खरेदी करण्याच्या योजनेलाही गेली अनेक वर्षे खीळ बसली आहे.
‘पी ७५आय’ या सहा नवीन पाणबुडय़ांसाठी भारत उत्सुक आहे. परंतु त्याबाबत अजून निविदाही काढलेल्या नाहीत. संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी याबाबत सांगितले की, निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तसेच हा प्रस्ताव मंत्रिमंडळ समितीसमोर आहे. मात्र असे असले तरी आतापर्यंतचा इतिहास बघता २०२० पर्यंत तरी या नवीन पाणबुडय़ा नौदलाच्या ताब्यात येणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. लहान पाणबुडय़ा वेगाने निकाली निघत असताना नवीन पाणबुडय़ा मिळविण्याचा वेग मंदावला आहे. अशा स्थितीत आयएनएस सिंधुरक्षकला मिळालेली जलसमाधी हा भारतीय नौदलासाठी एक धक्का आहे.
स्फोट कशामुळे झाला असावा?
भारतीय नौदलाच्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीला स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी भीषण स्फोटामुळे जलसमाधी मिळाली. या हादरविणाऱ्या दुर्घटनेची जी चौकशी होणार आहे, त्यात जे दोन स्फोट झाले ते नेमके कशामुळे झाले या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील, अशी अपेक्षा आहे. पाणबुडीतील शस्त्रसाठय़ाच्या एखाद्या सुटय़ा भागातील काहीतरी बिघाड हे या स्फोटाचे एक संभाव्य कारण असू शकेल. कारण बुधवारी सकाळी मोहिमेवर निघताना ही पाणबुडी शस्त्रांनी ठासून भरलेली होती. या पाणबुडीत पाणतीर (टॉर्पेडो) व जहाजांवर हल्ले करण्यासाठीची क्लबवर्गीय क्षेपणास्त्रे तसेच सुरुंगही होते. स्फोटापूर्वी ही सर्व स्फोटके व शस्त्रे पाणबुडीत सज्ज करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट कमांडर निखिलेश पाल हे या पाणबुडीचे एक कमांडर होते. त्यांच्या उपस्थितीत हा शस्त्रभरणा करण्यात आला. पाणबुडीविरोधी युद्धतंत्रातील एक जाणते अधिकारी विनय रामकृष्णन हेही त्या वेळी उपस्थित होते. पाणबुडीतील पाणतीर व इतर शस्त्रांना सुसज्ज ठेवण्याची तसेच त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर होती.
एखाद्या अस्त्राच्या स्फोटाने पाणबुडीवर आग लागली असण्याची शक्यता कमी आहे. पाणबुडीत आग लागून स्फोट झाले. त्यामुळे क्षेपणास्त्रे किंवा पाणतीर यातील इंधनगळतीमुळे ही आग लागली किंवा काय याचा चौकशीत तपास केला जाईल. आतापर्यंत पाणबुडय़ांमधील पाणतीरातील इंधनगळतीमुळे दोन मोठय़ा दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यात इ.स. २००० मध्ये रशियाच्या कस्र्क या पाणबुडीला जलसमाधी मिळाली होती. त्यात ११८ खलाशी होते. तर १९५५ मध्ये ब्रिटनच्या सिडॉन या पाणबुडीतही सदोष पाणतीरामुळे स्फोट झाला होता.
सिंधुरक्षकमध्ये बुधवारी स्फोट होण्यापूर्वी पाणबुडीत उपस्थित असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधला होता का, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या वेळी संदेशवहन अधिकारी अरुणकुमार साहू हे तिसरे अधिकारी तिथे होते.
सूत्रांच्या माहितीनुसार दैनंदिन काम संपल्यानंतर काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या आणि एका अधिकाऱ्याच्या मदतीने रात्रीच्या वेळी ही पाणबुडी किनाऱ्याला लावण्यात आली होती. प्राणोदक किंवा ऑक्सिडीकारक घटकांच्या गळतीनंतर पाणबुडीत पहिला स्फोट झाला व नंतर त्यातून आणखी मोठा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. तसेच तेथे असलेल्या कॅमेऱ्यातही ही दुर्घटना टिपली गेली आहे. त्यामुळे स्फोटाच्या चौकशीदरम्यान या गोष्टीही तपासल्या जातील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा