बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘जेस्पा’ नावाच्या सिंहाचा अकराव्या, रविवारी वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. जेस्पाचा जन्म संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच झाला. उद्यानात २००९ साली रविंद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला, गेल्यावर्षी गोपा आणि त्यानंतर गेल्याच महिन्यात, ऑक्टोबरमध्ये १७ वर्षांच्या रविंद्र सिंहाचाही मृत्यू झाला. त्यानंतर उद्यानात ११ वर्षांचा जेप्सा एकटाच राहिला. मात्र, तोही वृद्धापकाळाने आजारी असल्याने सिंह सफारीसाठी त्याला सोडण्यात आले नव्हते. जेस्पा सिंह गंभीर संधिवाताने ग्रस्त होता. त्याच्या मागच्या स्नायूं कमकुवत झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला उठताही येत नव्हते.
हेही वाचा >>>मुंबई: गोवरबाबत रॅपरच्या माध्यमातून जनजागृती; सामाजिक संस्थांचा मदतीचा हात
मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. गाढवे यांनी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, प्राथमिक अहवालानुसार अवयव निकामी झाल्याने आणि अशक्तपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले, अशी माहिती उद्यान प्रशासनाकडून देण्यात आली.आता नुकताच राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी दाखल झाल्यामुळे पर्यटकांना भविष्यात सिंह सफारीचा आनंद घेता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.