मुंबई : बँक कर्ज बुडवल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कॅनरा बँकेचे ५३८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडी तपास करत आहे.
कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी ३ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर, २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने मुंबईतील सात ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. त्या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडी तपास करत असून त्याबाबत ईडीने ही चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>> देशातील ७३ औष्णिक विद्युत प्रकल्प जोडणीच्या चार फेऱ्या पूर्ण; वर्षाला ६४२० कोटींची संभाव्य बचत होणे शक्य
कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ याकाळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता, बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली सीबीआयने भादंवि कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (२), १३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.