सणासुदीच्या काळात दिवसाढवळ्या गर्दीच्या वेळी दादर पश्चिम परिसरातील जवाहिराचे दुकान २४ ऑगस्ट रोजी फोडून सुमारे एक कोटी २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे अडीच किलो वजनाचे सोन्याचे दागिने लूटल्याची घटना घडली. शिवाजी पार्क पोलिसांनी सलग दहा दिवस तपास करून एका आरोपीला नालासोपाऱ्यातून, तर एकाला गुजरातमधून अटक केली.
दादर पश्चिम परिसरातील आर. के. वैद्य मार्गावरील सोन्याच्या दागिन्यांचे एक दुकान २४ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ दरम्यान फोडून चोरी करण्यात आली. दुकानाच्या मागील बाजूची लोखंडी जाळी तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला. चोरांनी दुकानातील सुमारे १ कोटी २४ लाख ६० हजार रुपये किमतीचे अंदाजे २ किलो ४९२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हयाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी सहा पथके तयार केली.
हेही वाचा : मुंबई : सिगारेटची एक हजार पाकिटे चोरणारा अटकेत
त्यानंतर सलग १० दिवस तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपीला नालासोपारा परिसरातून अटक करण्यात आली. तर गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल घेऊन पळून गेलेल्या आरोपीला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली. या आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती शिवाजी पार्क पोलिसांनी दिली.