वाळकेश्वर येथील राष्ट्रीयकृत बँकेतील दोन लॉकरमधून सुमारे ४७ लाख रुपये किंमतीचे सोने, हिरे व परदेशी चलनाची चोरी केल्याच्या आरोपाखाली बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. दिलीप चव्हाण असे आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून लॉकर विभागाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. आरोपीने बनावट चावीने लॉकर उघडून चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>> रेल्वे गोळीबार प्रकरणः पोलिसांनी १०० जणांकडून घेतली माहिती, सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात
नेपियन्सी रोड येथील ‘सागर तरंग’मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक मृणालिनी जयसिंघानी आणि त्यांच्या पतीचे वाळकेश्वर येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत दोन लॉकर आहेत. लॉकर क्रमांक ६३६ व ७७६ मधील ३१ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने, परदेशी चलन चोरीला गेले. यापूर्वी त्यांनी १० मार्च, २०२३ रोजी बँकेला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी लॉकरची पाहणी केली. त्यानंतर १७ जुलै रोजी पुन्हा तपासणी केली असता त्यातील ऐवज गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हेही वाचा >>> विक्रोळीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत
याप्रकरणी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. त्यावेळी आणखी एका ६६ वर्षीय व्यक्तीने त्याच शाखेतील लॉकरमधून १६ लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली. तेथे सीसी टीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. पण बाहेरील सीसी टीव्ही कॅमेरा व इतर तपासाच्या आधारावर १० मार्च ते १७ जुलै, २०२३ या कालावधीत चोरी झाल्याचा, बनावट चावी अथवा दुसऱ्या मार्गाने लॉकर उघण्यात आल्याचा संशय निर्माण झाला. त्या आधारावर तपास केला असता आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला. याप्रकरणी आरोपीकडून ४८१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी २०१३ मध्ये बँकेत कामाला लागला होता. गेल्यावर्षी वाळकेश्वर येथील शाखेमध्ये त्याची बदली झाली होती.