लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः अभिनेत्री करूणा वर्मा यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार केली आहे. तक्रारीत घरात ठेवलेल्या चार बांगड्या चोरलीला गेल्या असून त्यांनी घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अभिनेत्री करूणा वर्मा यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या घरातून चार सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या असून, त्यांची एकूण किंमत ८८ हजार रुपये आहे. तक्रारीमध्ये अभिनेत्रीने त्यांच्या घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

बांगूर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मालाड पश्चिम येथील एका इमारतीत राहतात. त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा २०१५ मध्ये ५० वा वाढदिवस होता. त्यावेळी आईने त्यांना सोन्याच्या बांगड्या भेट दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बेडरूपमध्ये एका उघड्या ड्रॉवरमध्ये त्या ठेवल्या होत्या. त्यांनी ९ मार्च रोजी बांगड्या पाहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ड्रॉव्हर तपासला असता त्यात बांगड्या सापडल्या नाहीत.

सुमारे एका महिन्यापूर्वी, अभिनेत्रीने घरकामासाठी मोलकरणी ठेवली होती. अभिनेत्री चित्रीकरणासाठी बाहेर गेल्यावर ती मोलकरीण घरी एकटीच असायची. बांगूर नगर पोलीस सध्या मोलकरीण शांतीसह आणि इतर काही लोकांची चौकशी करीत आहेत.

आठ महिन्यांपूर्वीच वास्तव्याला

अभिनेत्री करूणा वर्मा आठ महिन्यांपूर्वीच मालाड येथील घरात रहायला आल्या आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी घरात काम करणाऱ्या मोलकरणीविरोधात संशय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारीनुसार चार बांगड्या असून प्रत्येक बांगडी ११ ग्रॅम वजनाची आहे. अभिनेत्रीने १७ मार्च रोजी घरातील ड्रॉव्हरमध्ये बांगड्या शोधल्या. त्यावेळी त्यांना बांगड्या सापडल्या नाहीत. त्यांनी मोलकरणीसह सर्वांकडे बांगड्यांबाबत चौकशी केली. अखेर त्यांनी १७ मार्च रोजी याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल केल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. परिसरातील व इमारतीतील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाची तपासणीही करण्यात आली. पण अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मोलकरणीचीही चौकशी करण्यात आली असून बांगड्यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तिने चौकशीत पोलिसांना सांगितले.