मुंबई : झारखंडमध्ये लोखंडी सळ्यांची निर्मित करणाऱ्या कंपनीची पाच कोटी ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी लॉजिस्टिक कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कंपनीने तक्रारदार कंपनीला अव्वाच्या सव्वा दर वाढवून, तसेच बनावट पावत्या सादर करून कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. समृद्धी स्पाँज लिमिटेडच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंधेरीतील लॉजिस्टिक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कंपनी झारखंड येथे लोखंडी सळ्या बनवण्याचे काम करते.
हेही वाचा : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण : सिंधुदुर्गातील १८०७ एकर जमिनीवर ईडीची टाच, जमिनीची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये
कंपनी मध्य प्रदेश आणि ओरिसा येथील खाणींमधून कच्चा माल घेते. तो माल आणण्यासाठी तक्रारदार कंपनी वाहतूक कंपन्यांना कंत्राटी पद्धतीने काम देते. तक्रारदार कंपनीने २०२१ मध्ये मध्य प्रदेशातून झारखंडपर्यंत कच्चा माल आणण्याचे कंत्राट आरोपी कंपनीला दिले होते. त्यासाठी आरोपी कंपनीने अव्वाच्या सव्वा दराच्या ९ कोटी ४४ लाख रुपयांच्या पावत्या कंपनीला सादर केल्या. ती रक्कम तक्रारदार कंपनीने दिली होती. त्यावेळी लेखा परीक्षणात पाच कोटी ८९ लाख रुपयांच्या बनावट पावत्या सादर करण्यात आल्याचे तक्रारदार कंपनीला समजले. त्यानुसार केलेल्या तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी याप्रकरणी लॉजिस्टीक कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.