कपडे असो व दागिने..एखाद्या जुन्या पद्धतीच्या पेहरावाला वा अलंकाराला नवा मुलामा देण्याचा प्रकार फॅशन उद्योगात चांगलाच रुळला आहे. त्यात आपल्या आज्यापणज्यांपासून वापरल्या जाणाऱ्या झुमक्यांचाही समावेश करता येईल. जुन्या पद्धतीच्या या झुमक्यांना कधी मोत्यांचा, तर कधी मीनाकारीचा मुलामा देऊन ते आजच्या पिढीच्या तरुणींनाही कसे आवडतील या पद्धतीने तयार केले जातात. सध्या नवरात्रीच्या निमित्ताने तर ही झुमक्यांची बाजारपेठ चांगलीच तेजीत आली आहे.
भारतभर स्त्रियांमध्ये झुमके प्रसिद्ध आहेत. जुन्या दिल्लीत तर झुमक्यांची मोठी बाजारपेठ आहे. उत्तर प्रदेश झुमक्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला फक्त सोन्यात बनविल्या जाणाऱ्या झुमक्यांना आता मोत्यांची, कुंदन, खडय़ांनी आणखी देखणेपण आणले आहे. बाजारातही या नव्या पद्धतीच्या झुमक्यांना प्रचंड मागणी आहे. ‘रामलीला’सारख्या चित्रपटांपासून सुरू झालेला झुमक्यांचा ‘ट्रेंड’ सध्या तरुणींच्या कानात डुलताना दिसतो आहे. विद्या बालन, दीपिका पदुकोण, करिना कपूर या अभिनेत्रींनी झुमक्यांची मागणी आणखी वाढविली.
कुठल्याही पोशाखावर सुंदर दिसणारा हा झुमका सर्वाच्याच खिशाला परवडणारा आहे. २० रुपयांपासून सुरू होणारा झुमका अगदी दोन ते तीन हजारांपर्यंतच्या किमतीतही बाजारात उपलब्ध आहे. मुंबईत बऱ्याच ठिकाणी झुमक्यांची बाजारपेठ आहे. सध्या कुलाब्याच्या बाजारात तर नवरात्रीच्या निमित्ताने झुमकेच झुमके पाहायला मिळत आहेत. लहान ते मोठय़ा आकारापर्यंतचे वेगवेगळ्या कलाकुसरीचे झुमके येथे ५० ते १०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहेत. सांताक्रूझ पूर्वेला व मालाडलाही स्टेशनच्या जवळच्या बाजारात झुमक्यांचीच चलती आहे.
’ मीनाकारी झुमका – हे झुमके मुख्यत: राजस्थानमध्ये तयार केले जातात. विविध रंगामध्ये असलेले हे झुमके कुठल्याही पोशाखावर आकर्षक दिसतात. या झुमक्यांची खासियत त्यांच्या गडद रंगात आणि मीनाकारी नक्षीकामात आहे.
’ काश्मिरी झुमका – सोनेरी रंगाबरोबर लाल किंवा हिरव्याशी संगती केलेल्या झुमक्यांना बाजारात बरीच मागणी आहे. मोराचे नक्षीकाम असल्यामुळे हे झुमकेही उठावदार दिसतात.
’ दाक्षिणात्य झुमका – या झुमक्यांवर देवळांचे नक्षीकाम केले जाते. त्याचबरोबर प्राचीन भारतातील विविध कथांवर आधारित नक्षीकामही या झुमक्यांवर केलेले दिसते. ‘गुडलक चार्म’ म्हणूनही या झुमक्यांकडे पाहिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा