अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करण्यापूर्वी तिने आणि तिचा मित्र सूरज पंचोली यांच्यात ब्लॅकबेरीवरून झालेल्या संदेशांचा आरोपपत्रात समावेश करण्यात का आला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केला.
जियाने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आणि या प्रकरणी पोलीस सूरज पंचोलीला वाचवीत असल्याचा आरोप करीत राबिया यांनी प्रकरणाच्या ‘सीबीआय’ वा ‘एसआयटी’ चौकशीची मागणी पुन्हा एकदा न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले. तपास म्हणजे पोलिसांना जे हवे तेच नोंदवायचे, असे नाही, तर तपासादरम्यान जे काही पुरावे पुढे येतील ते खटला चालविणाऱ्या न्यायालयासमोर सादर करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानंतर न्यायालय त्यातील काय महत्त्वाचे हे ठरवेल आणि त्याआधारे काय निर्णय द्यायचा तो देईल, असे न्यायालयाने सुनावले. आत्महत्येपूर्वी जिया आणि सूरजमध्ये ‘बीबीएम’द्वारे एकमेकांना पाठविण्यात आलेल्या संदेशांचा आरोपपत्रात समावेश का करण्यात आला नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली.

Story img Loader