प्रियकर सुरज पांचोली याच्यासोबतच्या प्रेमसंबंधातील तणावामुळेच अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. प्रेमसंबंध आणि त्यातील तणावाबद्दल जियाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले सहापानी पत्र जियाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिले. पत्रामध्ये थेटपणे सुरजचा उल्लेख नसला, तरी ती व्यक्ती सुरजचं असल्याचा दावा जियाच्या कुटुंबीयांनी केलाय. 
सुरज आणि जियामध्ये शारीरिक संबंध आले होते आणि जियाने गर्भपातही केला होता, अशी माहिती पत्रातून स्पष्ट होते असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे मत आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत नसल्याचा आरोपही तिच्या कुटुंबीयांनी केला. जियाची आई रबिया यांनी शनिवारी हे पत्र पोलिसांकडे दिले. जियाच्या मृत्यूबद्दल कळल्यावर तिची लहान बहिण कविता ही देखील परदेशातून मुंबईत परतली. या विषयावर कविता म्हणाली, जियाच्या मनात नेमकी काय घालमेल चालली होती, ते संपूर्ण जगाला कळाले पाहिजे, यासाठीच आम्ही ते पत्र पोलिसांकडे दिले आहे.
जिया खानने लिहिलेल्या पत्रात सुरजबरोबरच्या तिच्या संबंधांमध्ये तणाव होता, याबद्दल उल्लेख आहे. मात्र, पोलिस तसा तपास करीत नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांना केला.
जियाच्या दफनविधीवेळी सुरजला आम्ही बोलावलेसुद्धा नव्हते. सुरजने तिथे यावे, असे आम्हाला वाटतसुद्धा नव्हते, असे सांगून कविता म्हणाली, काम मिळत नसल्यामुळे जिया निराश नव्हती. ती खूप धैर्यवान मुलगी होती. आमच्या दोघीमध्ये शेवटचे बोलणे झाले, त्यावेळी ती काही ऑफर मिळणार असल्यामुळे आनंदी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा