मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात अभिनेता आदित्य पांचोली याला साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली. आदित्य पांचोली याचा मुलगा आणि अभिनेता सूरज या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्यामुळे आदित्य याला सरकारी पक्षाचा साक्षीदार म्हणून पाचारण करण्यात आल्यास तो मुलाला मदत करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा >>>“राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर सलग तीन चित्रपट केल्यामुळे…”, अमृता खानविलकरने सांगितला ‘तो’ किस्सा
परिणामी, त्यामुळे सरकारी पक्षाचा दावा कमकुवत होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य याला साक्षीदारांच्या यादीतून वगळल्यात आले आहे, अशी माहिती सीबीआयतर्फे न्यायालयाला देण्यात आली. पोलिसांनी आदित्य पांचोली याचा जबाब नोंदवला होता. त्यानुसार, जिया हिच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आपण तिच्या घरी गेल्याचे आदित्य याने पोलिसांना सांगितले होते.
हेही वाचा >>> Pathaan Box Office Collection: शाहरुख खानच्या ‘पठाण’ने १६ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
जिया हिने २०१३ मध्ये आत्महत्या केली होती, सूरज याने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या आरोपांतर्गत सूरजवर सध्या खटला चालवण्यात येत आहे. उच्च न्यायालयाने सूरज याला जामीन मंजूर केला होता. त्यामुळे सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दरम्यान, सूरज याने जिया हिची हत्या केल्याचा आरोप तिची आई राबिया खान हिने केला आहे. सूरज याच्यावर जिया हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाऐवजी खुनाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्याच्या मागणीसाठी राबिया हिने उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली.