सूरज पांचोलीची मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) पन्नास हजार रूपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर सुटका केली. मात्र, उच्च न्यायालयाने सूरजला आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले असून एकदिवसाआड पोलीस स्थानकामध्येही हजेरी लावण्याची अट घातली आहे.
एकवीस वर्षीय सूरजला अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्य़ात आली होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला आहे.
सूरज पांचोली हा बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री झरीना वहाब यांचा मुलगा आहे.  
सूरजसोबतच्या प्रेमसंबंधातील तणावामुळेच अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असा जियाच्या कुटुंबीयांचा दावा आहे. प्रेमसंबंध आणि त्यातील तणावाबद्दल जियाने काही दिवसांपूर्वी लिहिलेले सहापानी पत्र जियाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिले. पत्रामध्ये थेटपणे सूरजचा उल्लेख नसला, तरी ती व्यक्ती सूरजचं असल्याचा दावा जियाच्या कुटुंबीयांनी केला आहे. सूरज आणि जियामध्ये शारीरिक संबंध आले होते आणि जियाने गर्भपातही केला होता, अशी माहिती पत्रातून स्पष्ट होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे मत आहे.

Story img Loader