अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सूरज पांचोलीला गुरुवारी न्यायालयाने २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सूरजच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची सरकारी पक्षाची मागणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सीमा जाधव यांनी फेटाळली. सूरजने दाखल केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे.
जिया खानने आपल्या प्रियकराला लिहिलेल्या सहा पानी पत्रामध्ये बलात्कार (रेप) हा शब्दप्रयोग वापरला आहे. हे पत्र जियाने सूरजलाच लिहिले होते, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जियाने उल्लेख केलेल्या या घटनेचा तपास करायचा असल्यामुळे सूरजची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी वकील ए. के. पाचर्णे यांनी केली. जियाने आत्महत्येपूर्वी सूरजला पाठविलेले एसएमएस त्याने डिलिट केले आहेत. ते पुन्हा मिळवून त्याचा आत्महत्येशी काही संबंध होता का, याचीही तपासणी करायची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली.