पूर्वाश्रमीचा मॉडेल आणि वेषभूषाकार अनिल चेरियन (४२) याचा मृतदेह गोराई येथील बंगल्यात आढळला आहे. या बंगल्यात तो मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी गेला होता. गोराई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी सर्व शक्यता पडताळण्यात येत आहेत. अनिल हा दिवंगत अभिनेत्री जिया खानचा वेषभूषाकार होता.
अनिल चेरियन जुहू तारा रोड येथील संगीता अपार्टमेंटमध्ये राहात होता. शनिवारी ७ सप्टेंबर रोजी त्याची सहकारी मीनल आपल्या मित्रांसमवेत गोराई समुद्र किनाऱ्याजवळील फॅन्सिको रिसॉर्टमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. त्याची माहिती अनिलला मिळाल्यावर त्याने मीनलला फोन करून तोही पार्टीसाठी गेला. मीरा रोड येथून तो मित्राची मोटारसायकल घेऊन उत्तनमार्गे या रिसॉर्टला गेला. या ठिकाणी मीनल तिचा प्रियकर आणि अन्य चार- पाच जण होते. रात्री तीनपर्यंत या ठिकाणी सर्वानी मद्यपान केले. त्या वेळी अचानक चेरियन मोबाइलवर बोलत निघून गेला, असे मीनलने पोलिसांना सांगितले. सकाळी अनिल घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने मीनलकडे विचारणा केली होती. अनिलचा फोनही बंद असल्याने पत्नीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात रविवारी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. सोमवारी बंगल्याजवळील विहिरीत अनिलचा मृतदेह आढळला.

Story img Loader