लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: सी. के. बिर्ला समूहातील जिमको इंडियाच्या नागपूरमधील बुटीबोरी आणि हिंगणा येथील एकात्मिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि कार्यान्वयन झाल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले. या प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हे प्रकल्प म्हणजे जागतिक गुणवत्तेची दुरुस्ती, पुनर्बांधणी, आणि सुट्या भागांचे वितरण अशी कामे होणारी केंद्रे ठरणार असून, महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा अशा व्यापक क्षेत्रातील ग्राहकांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची ठरतील, असे बुटीबोरी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात जिमको इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चन्द्रशेखर व्ही. म्हणाले. खाणकाम, बांधकाम, ऊर्जा आणि वाहतूक या महत्त्वाच्या क्षेत्रासाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या सेवा-दुरुस्ती यासाठी लागणारा वेळ यातून घटेल, सुट्ट्या भागांची उपलब्धता सुधारेल आणि यंत्रांची स्थिती उत्तम ठेवण्यात मदत होईल.
सुमारे १४ एकर क्षेत्रात उभारले गेलेले हे बुटीबोरी आणि हिंगणा प्रकल्प प्रगत सेवा, यंत्रांची तसेच घटकांची पुनर्बांधणी आणि सुट्या भागांचा विस्तृत साठा यांसह सक्षम असून ग्राहकांच्या विविध गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करू शकतील. दोन्ही प्रकल्पांमध्ये एकूण २५० कुशल कर्मचारी सेवेत असतील.