मुंबईः बँकेतर वित्तीय कंपनी असलेला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात जिओ फायनान्सने समभाग तारणावर डिजिटल माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना समभाग तारण ठेवून ९.९९ टक्के व्याजदरासह पूर्णपणे डिजिटल माध्यमातून झटपट कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जिओ फायनान्सने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा घेऊन स्पर्धात्मक व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्याची सेवा प्रस्तुत केली असून डिजिटल प्रक्रियेमुळे केवळ दहा मिनिटांत कर्ज मिळविता येईल, असा दावा केला आहे. जिओ फायनान्स ॲपच्या माध्यमातून समभाग आणि म्युच्युअल फंड तारण ठेऊन कर्ज देण्यात येईल. ग्राहकांना यासाठी समभाग विकण्याची आवश्यकता नसल्याचे जिओ फायनान्सने म्हटले आहे. ग्राहक त्यांच्या वैयक्तिक जोखीमीनुसार, ९.९९ टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या व्याजदरात १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. ही कर्जे जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी आहेत, ज्यामध्ये कोणतेही मुदतपूर्व परतफेडीचे (फोरक्लोजर) शुल्क नाही, असे जिओ फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुसल रॉय म्हणाले.

जिओ फायनान्स ॲप हे यूपीआय देयके, निधी हस्तांतरण, बचत खाती, डिजिटल सोने, विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओ ट्रॅकिंग यासारख्या वित्तीय सेवांचा एक व्यापक संच देखील प्रदान करते.