राज्य दुष्काळाच्या खाईत असताना राष्ट्रवादीचे मंत्री चंगळवाद करण्यात गुंतले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिनकामाचे मंत्री असून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी स्वत:च्या काकांनी म्हणजे शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खुपसेला खंजीर आठवावा आणि सोनिया गांधी यांच्यापुढे केलेली लाचारी लक्षात घ्यावी, असा सज्जड दम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिला.
कामगारांच्या देशव्यापी संपाच्या पाश्र्वभूमीवर सुमारे ३४ संघटनांनी सोमवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. या मोर्चापुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा काढला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पवारांना घरचा रस्ता दाखवला. आता सत्तेसाठी त्याच सोनियांपुढे लाळघोटेपणा करण्याचे काम तुमचे काका करीत आहेत, असे अजित पवार यांना सुनावत उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी सत्तेसाठी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही.
 महाराष्ट्राची जनता दुष्काळाने त्रस्त झालेली असताना राष्ट्रवादीचे मंत्री व पदाधिकारी आपल्या नातेवाईकांची राजेशाही थाटात लग्न करण्यात मग्न आहेत. या कामगारविरोधी सरकारला हाकलण्याची गरज आहे.
बाळासाहेबांनी तत्वासाठी कधी तडजोड केली नाही की कोणापुढे लाळघोटेपणा केला नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, कामागारांच्या देशव्यापी संपाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा राहील. मात्र बारावीच्या परीक्षा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना कोणाताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रातील मनमोहन सिंग सरकार हे कामगार विरोधी असून कंत्राटी कामागाराला माणूस म्हणून जगू द्या, अशी मागणी त्यांनी केली.
कामगार संघटनांनी एकजूट दाखवली तर केंद्र आणि महाराष्ट्रातील कामगार विरोधी सरकारला सहज हाकलता येईल. त्यामुळे कामगार संघटनांनी आपापल्या चुली बंद कराव्यात आणि एकच होळी पेटवावी. त्यात काँग्रेसचे सरकार भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader