बेकायदा इमारतींवरील कारवाई थांबावी यासाठी बंदचे हत्यार उगारून गल्लोगल्ली दंडेलशाहीचे प्रदर्शन घडवत ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्या राजकीय नेत्यांनी शुक्रवारी तोंडदेखला का होईना आपला माफीनामा नागरिकांपुढे सादर केला. आम्ही बेकायदा बांधकामांच्या पाठीशी नाही. परंतु, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या दहा लाख रहिवाशांसाठी आम्हाला बंद करावा लागला, अशी सारवासारव या बंदचे प्रवर्तक एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली. वागळे आगारात जाऊन टीएमटीच्या बसेस रोखण्यात आघाडीवर असलेले एकनाथ शिंदे यांनी तर गुरुवारचा बंद लोकशाही मार्गाने करण्यात आला, असा दावा करत सर्वानाच धक्का दिला.  
बेकायदा इमारतींना संरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने गुरुवारी आयोजित केलेल्या बंदला सर्वसामान्य ठाणेकरांनी अक्षरश: धाब्यावर बसविले. दादागिरी, दहशतीच्या जोरावर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्याची करामत करून दाखवली. तरीही सर्वसामान्य ठाणेकरांनी पायपीट करत रेल्वे स्थानक गाठून बंद समर्थकांना वाकुल्या दाखविल्या.
बंदफटका बसलेल्या नागरिकांमधून तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत, हे लक्षात येताच एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघा नेत्यांनी शुक्रवारी ठाणेकर जनतेची माफी मागितली. गुरुवारच्या बंदमुळे ज्या ठाणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे, त्यांच्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत, अशी नौटंकी या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केली. बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या दहा लाख रहिवाशांसाठी उर्वरित ठाणेकरांनी थोडा त्रास सहन करावा, असे आवाहन करत या नेत्यांनी मात्र बंदचे समर्थन केले. त्यामुळे हा माफीनामा तोंडदेखला होता, हे स्पष्ट झाले.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राजकीय मतभेदामुळे स्थायी समिती स्थापन होण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाल्याचे चित्र असतानाही राजकीय पक्षांचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले नाही. तसेच आजही काही समित्याही राजकीय वादामुळे न्यायालयाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत इमारती वाचविण्यासाठी एकत्र येणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना शहरातील विकास कामे रखडवताना कसे काही वाटले नाही, या प्रश्नावर मात्र या दोन्ही नेत्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. महापालिकेत एकत्र येण्याविषयी लवकरच निर्णय घेऊ, असे आमदार शिंदे आणि आव्हाड यांच्याकडून सांगण्यात आले.

भाजपची सावध भूमिका..
सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुकारलेल्या ‘ठाणे बंद’ ला भाजपने विरोध केला होता. मात्र, अनधिकृत बांधकामांविषयी सर्व पक्षीय नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस भाजपचे उपमहापौर मिलिंद पाटणकर उपस्थित होते. ठाणे बंद आंदोलन करण्याची गरज नव्हती. मात्र, अनधिकृत इमारतीमध्ये राहणारे नागरिक बेघर होऊ नयेत, अशी आमच्या पक्षाची भूमिका होती. या संबंधी महापालिकेमध्ये करण्यात आलेल्या ठरावास भाजपच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे, असे पाटणकर यांनी या वेळी स्पष्ट केले.