राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी ऐन दिवाळीत मोठी आनंदाची घोषणा केलीय. या निर्णयाला आव्हाड यांनी क्रांतीकारी निर्णय म्हटलंय. यानुसार मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना आता त्यांची झोपडी पुनर्विकासांतर्गत तोडण्यात आल्यानंतर ५ वर्षातच त्याच्या विक्रीचा अधिकार मिळणार आहे. याआधी झोपडीच्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत इमारत बांधल्यानंतर आणि घराचा ताबा मिळाल्यानंतर १० वर्षांनी त्या घराच्या विक्रीला परवानगी होती. झोपडपट्टीवासीयांसाठी त्यांची झोपडी ही संपत्ती असते. तिच्यावर आम्हाला टाच नको आहे, म्हणून हा निर्णय घेत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.
“मुंबईत झोपडी तोडल्यानंतर ५ वर्षात विकता येणार”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मुंबईतील लोकसंख्येपैकी ६०-६५ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. हातावर पोट असणारी माणसं मुंबईत अधिक आहेत. त्यामुळे एक क्रांतीकारी निर्णय घ्यायचं आम्ही ठरवलं आहे. बिल्डिंग बांधून झाल्यावर राहायला गेल्यानंतर १० वर्षांनी ती खोली विकता येत होती. आता झोपडी मालकांना झोपडी तोडल्यानंतर ५ वर्षात एसआरएच्या परवानगीने विकता येईल. विक्रीसाठी इमारतीचं बांधकाम पूर्ण होण्याची आणि त्यानंतरची १० वर्षे वाट पाहण्याची आवश्यकता नाही.”
“मला वाटतं हे घर म्हणजे त्या गरिबाची धनसंपत्ती आहे. पोरीचं लग्न, घरातील आजारपण या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही धनदौलत असते. त्यामुळे त्या गरिबाच्या घराच्या संपत्तीवर आमची टाच असावी असं आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंब प्रमुख, कुटुंब वत्सल म्हणून ओळखले जातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या समितीने हा निर्णय घेतलाय,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
झोपडपट्ट्यांबाबतचा निर्णय घेणाऱ्या समितीत कोण?
या समितीत गृहनिर्माणमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड अध्यक्ष, नवाब मलिक, अनिल परब, आदित्य ठाकरे, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड इत्यादी सदस्य होते. या समितीने हा निर्णय घेतलाय. “कुठल्याही जाती प्रांताचा असू द्या त्या प्रत्येक गोरगरीब मुंबईकरांना ही दिवाळीची गोड भेट मिळायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेण्यात आला,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
“मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल”
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपली झोपडपट्टीची मर्यादा २००० पर्यंत आहे. ही मर्यादा मोफत घर देण्याची आहे. त्यापुढे २००० ते २०११ या काळातील पात्र ठरलेल्या झोपडपट्टी धारकांना आम्ही दुसरी एक दिवाळीची गोड भेट देत आहोत. त्यांना दिल्या जाणाऱ्या घराची किंमत केवळ अडीच लाख रुपये असेल. त्या घराचं क्षेत्रफळ ३०० चौरस फूट असेल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय करण्यात आलाय. यामुळे मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल.”