राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. तसेच फेब्रुवारी २०३ च्या पक्षाला जून २०२२ मध्ये आणून ठेवणार असाल तर ते हास्यास्पद आहे, असंही त्यांनी म्हटलं. ते बुधवारी (१७ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष या जबाबदारीच्या पदावर बसले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर टीका-टिपण्णी केली. त्यांचं बोलणं आणि न्यायालयाचं म्हणणं दोन्ही विरोधाभासी गोष्टी आहेत. त्यांना साधं हे समजायला हवं होतं की, राजकीय पक्ष म्हटल्यावर जुलै २०२२ मध्ये कोणता राजकीय पक्ष होता. फेब्रुवारी २०३ च्या पक्षाला जून २०२२ मध्ये आणून ठेवणार असाल तर ते हास्यास्पद आहे. तसं कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे.”
“न्यायालयाने फूट नाकारली आहे”
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पान क्रमांक ११९ व १२० वर स्पष्टपणे मर्यादा लक्षात आणून दिल्या आहेत. न्यायालयाने फूट नाकारली आहे. फूट नाही म्हणजे केवळ अपात्रता उरली आहे. राजकीय पक्षानेच व्हिप आणि नेता नियुक्ती करायचा असं निकालात म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना बोलण्यासाठी संधीच नाही,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“…म्हणजे नार्वेकरांनी एखाद्या बाजूला सरकण्यासारखं आहे”
“अध्यक्षांना बोलण्याची संधीही आहे, मात्र साधा अलिखित नियम आहे की, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निर्णयाचे अधिकार दिले तेव्हा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका-टिपण्णी करणं म्हणजे एखाद्या बाजुला सरकण्यासारखं आहे,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.