गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुनील गावस्कर यांना ३३ वर्षांपूर्वी क्रिकेट अकादमीसाठी सरकारने दिलेल्या भूखंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या ३३ वर्षांपासून या भूखंडावर क्रिकेट अकादमीचं बांधकाम करण्यात आलेलं नाही. त्यावरून सुनील गावस्कर यांच्यावर टीका होत असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनील गावस्कर यांच्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी गावस्करांविषयी ट्वीट केल्यानंतर दुपारी त्यांनी एबीपी वाहिनीशी बोलताना आपली भूमिका सविस्तर मांडली. तसेच, “गावस्करांना मी अरेतुरे करतो म्हणून माझ्यावर मोठी टीका होत आहे. पण तो आपलाच वाटतो मला म्हणून बोललो”, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“माझी इतकीच अपेक्षा आहे की…”
गावस्कर यांनी त्या भूखंडावर क्रिकेट अकादमी सुरू करून तिथून १५-२० सुनील गावस्कर घडवावेत, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. “सुनील गावस्कर माझ्यासाठी देव आहे. माझी अपेक्षा इतकीच आहे की सरकारने एवढं दिलंय. बांद्र्यासारख्या प्रमुख ठिकाणी तुम्हाला एवढी मोठी जमीन मिळतेय. विविध सवलती म्हाडाकडून दिल्या जाणार आहेत. फक्त सुनील गावस्कर या नावासाठी शासन सुविधा देतंय. आता तरी त्यातून १५-२० सुनील गावस्कर घडावेत”, असं आव्हाड म्हणाले.
“ज्याला देव मानला, त्या देवालाच…”
दरम्यान, सुनील गावस्कर यांनी इतक्या वर्षांत क्रिकेट अकादमीचं काम का केलं नाही, यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सुनील गावस्करला माझ्या दृष्टीने सगळं माफ आहे. ज्याला मी देव मानला, त्या देवालाच मी प्रश्न विचारणार नाही. त्यांना मी विचारणार नाही की तुम्ही हे का केलं नाही. पण माझी त्या देवाकडून अपेक्षा आहे, की त्यांनी किमान १० तरी सुनील गावस्कर घडवावेत. आजची मुंबईची टीम आणि सुनील गावस्कर यांच्या काळातली टीम यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यावर काम करावं”, असं आव्हाड यांनी नमूद केलं आहे.
…तर मी गावस्करांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट
गावस्कर उत्तम कॉमेंट्री करतात, पण…
“सुनील गावस्कर यांची कॉमेंट्री. ते जगातले एक उत्तम कॉमेंट्री करणारे आहेत. पण आता हळूहळू तेही वयाप्रमाणे कमी होत जाईल. त्यामुळे त्यांनी इथे लक्ष केंद्रीत करायला हवं. मुंबईची सध्याची क्रिकेटची हालत सुधारण्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे”, असं देखील जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
क्रिकेट प्रशिक्षणासाठी ‘सुनिल गावस्कर क्रिकेट फाऊंडेशन’ला हा भूखंड देण्यात आला होता. मात्र दोन हजार चौरस मीटरच्या या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडाचा इतक्या वर्षात प्रशिक्षणाच्या दृष्टीने कोणताच विकास झाला नव्हता. आता म्हाडासोबत ३० दिवसांच्या आत भाडेकरार करावा आणि करार केल्यानंतर एक वर्षाच्या आत भूखंडावर बांधकाम सुरू करण्याच्या व तीन वर्षांत ते पूर्ण करून तिथे प्रशिक्षण सुरू करण्याच्या अटीवर गावस्कर फाऊंडेशनला क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांच्या प्रशिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हा भूखंड क्रिकेट प्रशिक्षणासाठी देण्यात आल्याने इतर खेळांसोबतच क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाईल, याची हमी फाऊंडेशनला द्यावी लागणार आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या नफ्याच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार आहे.
गावस्कर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर १९८८ साली क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या अटीवर त्यांना हा भूखंड म्हाडाकडून देण्यात आला होता. परंतु अत्यंत मोक्याच्या जागी असलेला हा भूखंड कुठल्याही वापराविना पडून असल्याने काही संस्थांनी तो आपल्याला मिळावा यासाठी म्हाडाकडे मागणी केली. दरम्यान, भूखंड देताना घातलेल्या अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी गावस्कर यांनी जानेवारी, २०२० आणि मार्च, २०२१ साली म्हाडाला पत्र लिहून केली. ती मान्य करत गावस्कर यांना बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिस या खेळांच्या प्रशिक्षणासही परवानगी दिली आहे.
याआधी संबंधित भूखंडावर नोव्हेंबर, २००२ साली हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशिअम, स्विमिंग पूल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कॅफेटेरिया इत्यादी सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आता क्रिकेटसोबत इतरही खेळांचे प्रशिक्षण या ठिकाणी मिळेल. याशिवाय खेळाडूंना दुखापत झाल्यास उपचारासाठी आरोग्य केंद्र, क्रीडाविषयक तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिण्यासाठी सभागृह उभारता येणार आहे. तसेच आधीचे ‘इनडोअर क्रिकेट स्टेडियम’ऐवजी ‘मल्टी फॅसिलिटीज स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर अॅण्ड आऊटडोअर फॅसिलिटीज’ असे नाव बदलण्यासही मान्यता देण्यात आली आहे.