लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉग्रेस पक्षाशी उघड संघर्ष टाळत राष्ट्रवादी काँॅग्रेस पक्षाने शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील पोटनिवडणुकीत  माघार घेण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या माघारीमुळे ठाणे महापालिकेच्या दोन प्रभागांमधून काँॅग्रेसचे राजन किणे आणि आशिया कुरेशी बिनविरोध विजयी झाले असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना काँग्रेसने कात्रजचा घाट दाखविल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 महापौर निवडणुकीतील पराभवानंतर राजन किणे यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी जंगजंग पछाडले होते. मात्र, मुंब्र्यातील पोटनिवडणुकीत किणे यांच्याविरोधात उमेदवार उभा केल्यास ठाणे महापालिकेतील आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा काँॅग्रेस नेत्यांनी दिला होता. अखेर ज्या नगरसेवकांच्या पराभवासाठी ताकद पणाला लावली, त्याच राजन किणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आव्हाडांना प्रशस्त करुन द्यावा लागला आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर विरोधक म्हणून किणे ओळखले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीने किणे यांच्याविरोधात महेंद्र कोमुर्लेकर यांना उमेदवारी देत काँॅग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.
कळवा-मुंब्रा परिसर कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे मुंब््रयात दोन्ही काँग्रेस आमने-सामने आल्याने राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची डोकेदुखीही वाढली होती. या पाश्र्वभूमीवर राजन किणे आणि आशिया कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली असून ठाणे महापालिकेतील पक्षाचे संख्याबळ १७ झाले आहे.

जखमेवर मीठ..
ठाणे महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या मतदानावेळी गैरहजर रहात काँॅग्रेसच्या मुंब्रा परिसरातील तिघा नगरसेवकांची सेनेचा विजय सोपा केला होता. याप्रकरणी आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने कोकण आयुक्तांकडे राजन किणे, अनिता किणे, शकिला कुरेशी यांच्याविरोधात पक्षविरोधी वर्तणुकीबद्दल तक्रार दाखल केली होती.आयुक्तांनी या याचिकेवर सुनावणी देताना तिघांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्यामुळे या प्रभागांमध्ये पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. कॉग्रेसने या प्रभागातून पुन्हा किणेंना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले होते.

Story img Loader