राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटकंचुकी प्रथेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. “प्रथेप्रमाणे ५००० वर्षे शूद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज झाकताच येत नव्हते. याचे कुणी उत्तर देईल का?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. तसेच “५००० वर्षे स्त्री उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये,” असं म्हणत हल्लाबोल केला. त्यांनी सोमवारी (९ जानेवारी) ट्वीट करत याबाबत भूमिका व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “याचे कुणी उत्तर देईल का की, प्रथेप्रमाणे ५००० वर्षे शूद्र स्त्रियांना वक्ष म्हणजेच उरोज झाकताच येत नव्हते. घटकंचुकीची माहिती द्या की नव्या पिढीला. कमीतकमी आजच्या स्त्रियांना मनाप्रमाणे वागता तरी येते. ५००० वर्षे स्त्री ही उपभोगाची वस्तू म्हणून उपभोगणाऱ्यांनी भुंकू नये.”
हेही वाचा : स्वातंत्र्यदिन विशेष लेख : …अन् त्यांनी स्तन झाकण्याचं स्वातंत्र्य मिळवलं
“‘जय भीम’ हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे”
दरम्यान, याआधी आव्हाडांनी संयुक्त राष्ट्रसंघातील एक व्हिडीओही ट्वीट केला होता. यात ते म्हणाले, “संयुक्त राष्ट्रसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येशू ख्रिस्त, मोसेस, जेफर्सन आणि लिंकन यांच्याबरोबर तुलना करण्यात आली. त्याचबरोबर तेथे जय भीमचा नाराही देण्यात आला. मी म्हणतो ते सत्य आहे की, ‘जय भीम’ हा कुठल्याही जातीचा नारा नसून ते क्रांतिकारी ऊर्जास्रोत आहे.
“बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही?”
आव्हाडांनी बिहारमधील जातनिहाय जनगणनेवरही आपली भूमिका स्पष्ट केली होती. “बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेत एकमतानी ठराव पारीत केला आहे. हा ठराव करायचा म्हणून केला का? हा ठराव केला तेव्हा नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते,” असं मत आव्हाडांनी व्यक्त केलं होतं.
जातनिहाय जनगणनेवर तेजस्वी यादव काय म्हणाले होते?
जातनिहाय जनगणनेवर तेजस्वी यादव म्हणाले होते, “बिहारमध्ये ७ जानेवारीपासून जातनिहाय जनगणना सुरू होईल. यामुळे अर्थसंकल्पीय तरतूद आणि समाजकल्याणाच्या योजनांसाठी वैज्ञानिक आकडेवारी मिळेल. भाजपाला हे नको आहे. कारण ते गरीबविरोधी आहेत.”