रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर भागात झालेल्या दंगलींच्या घटनांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान केलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटतय, असं ते म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान सध्या चांगलच चर्चेत आहे.
हेही वाचा – “वाघाला सुरक्षेची गरज नसते” संजय राऊत यांचं गुलाबराव पाटील यांच्या आव्हानाला आक्रमक उत्तर
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दंगलींच्या घटनांवरून शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. “रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी आणि रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्याकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे ते म्हणाले.
दरम्यान, आव्हाडांच्या या विधानावरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे कट्टर हिंदुत्वविरोधी नेते आहेत, हे या वक्तव्यावरून सिद्ध झालं असल्याचे ते म्हणाले. तसेच येणारं वर्ष हे जातीय दंगलींच असेल असं जितेंद्र आव्हाड ठामपणे म्हणत असतील तर राज्यात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली.