राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून महाविकास आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विधानाविरोधात ‘महाराष्ट्र बंद’चे संकेत दिले होते. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडदेखील या प्रकरणी आक्रमक झाले असून राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावीच लागेल, असे ते म्हणाले. टीव्ही ९ या वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – ‘महापुरुषांची बदनामी करु नका’, राज ठाकरेंनी ठणकावल्यानंतर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “कोणीही…”
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
“राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करणारा मी पहिला होतो. राज्यपालांचे आता वय झाले आहे. पण त्यांची बुद्धी अजूनही सातव्या-आठव्या वर्षावर आहे. त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात जे विधान केले होते, एवढे घारणेरडे विचार अशा मोठ्या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हते. ते ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांवर बोलले, तेही महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंदचा निर्णय घ्यावाच लागेल”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
हेही वाचा – ‘राज्यपाल हटाव’च्या मुद्द्यावर संभाजीराजे-उदयनराजे आक्रमक, अजित पवार म्हणाले, “कोश्यारी खासगीत म्हणतात…”
“राज्यपालांच्या विधानानंतर लोकभावनांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रातील लोकं प्रचंड चिडलेली आहेत. मी जेम्स लेनच्या मुद्द्यावर जेव्हा महाराष्ट्र फिरलो, तेव्हा लोकांमध्ये असलेला संताप मी बघितला होता. लोकं अशा गोष्टी सहन करत नाहीत. जेव्हा शिवाजी महाराजांबाबत नको ते बोललं जातं, तेव्हा लोकं अस्वस्थ होतात, कारण शिवाजी महाराज लोकांच्या हृदयात आहेत. त्यांच्या विरोधात कोण हा कोश्यारी हुशारी दाखवतो? खरं तर आतापर्यंत या कोशारींना महाराष्ट्रातून हकलायला पाहिजे होते”, असेही ते म्हणाले.
“राजकीय अभिनिवेश बाजुला ठेऊन लोकांच्या मनातला राग आणि लोकांच्या मनातला उद्रेक बघता महाविकास आघाडीला ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय घ्यावाच लागेल. याबाबतीत मी स्वत: शरद पवार यांना विनंती करणार आहे. कारण हा विषय सोडण्यासारखा नाही. दर पाच-सात वर्षांनी तुम्ही शिवाजी महाराजांबाबत एखादा विषय काढता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वार शंका उपस्थित करता, यावर विचार करणे गरजेचे आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – Maharashtra-Karnataka Border Dispute : मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार
दरम्यान, यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. राज ठाकरे यांनी रविवारी गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राजकीय नेत्यांनी आता महापुरुषांची बदनामी करणे थांबवावे, असे विधान केले होते. यासंदर्भात बोलताना जिंतेंद्र आव्हाड म्हणाले, ”हर हर महादेव चित्रपटात मनोविकृती दाखवण्यात आली आहे. इतिहासाचं विकृतीकरण दाखवण्यात आलं आहे. याच कारणामुळे मला काही लोकांकडून अपेक्षा होत्या. एकीकडे महापुरूषांबद्दल काहीही बोलू नका असे म्हणायचे आणि दुसरीकडे ज्या चित्रपटात इतिहासाचे विद्रुपीकरण देण्यात आले, त्या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला. या चित्रपटात काय काय आहे. याबात राज ठाकरे यांना माहिती नव्हते का. तरीदेखील त्यांचे लोक हा चित्रपट मोफत दाखवत होते. राज ठाकरे काल जे बोलले त्यावर त्यांनी कायम राहावे. मात्र चित्रपटासाठी वेगळी भूमिका, नाटकांसाठी वेगळी भूमिका, पुस्तकांसाठी वेगळी भूमिका आणि बोलताना वेगळी भूमिका असे चालत नाही. एकाच वेळी चार भूमिका घेता येत नाहीत”