डेव्हिड हेडलीच्या साक्षीतून गुरूवारी इशरत जहाँप्रकरणाचे धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. अहमदाबाद येथील चकमकीत इशरत जहाँ मारली गेल्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात त्याचे मोठे पडसाद उमटले होते. त्यावेळी आव्हाडांनी इशरतला निर्दोष ठरवत तिच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र, आज डेव्हिड हेडलीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या साक्षीत इशरत लष्कर-ए-तोयबाची हस्तक असल्याचा खुलासा केला. याबद्दल आव्हाडांना विचारण्यात आले असता त्यांनी मला इशरत प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल, असा बचावात्मक पवित्रा घेतला.  हेडली नेमके काय म्हणाला हे मला अद्याप माहित नाही. त्याबाबत मला आधी जाणुन घ्यावे लागेल, असेही आव्हाडांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीकडे आपली भूमिका मांडताना हेडली हा डबल एजंट असल्यामुळे त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा, अशी शंकाही उपस्थित केली. हेडलीला इशरतबद्दल काहीही माहिती नव्हते. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हेडलीच्या तोंडून तसं वदवून घेतल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. सध्या देशामध्ये भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी रोहित वेमुल्ला आणि इशरत जहाँसारख्या प्रकरणांचे राजकारण सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये हिंदुंच्या मतांचे धुव्रीकरण करण्याच्यादृष्टीने हे राजकारण सुरू असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा