कुवेतमध्ये प्रेषित मोहम्मद यांचा अपमान झाल्याच्या निषेधात कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. तसेच आम्हाला हे मान्य नसल्याचं म्हणत या कृतीचा निषेध केलाय. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपाला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच, पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो.”
“कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे हे चुकीचेच”
“भाजपाच्या प्रवक्त्याने पैगंबरांबद्दल जे काही लिहिले होते, ते अगदीच चुकीचे होते. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे हे चुकीचेच आहे. जे कोणी असे विद्वेषाचे प्रयोग करीत असतात त्यांना कडक शासन झालेच पाहिजे. तरच समाजात सलोखा राखला जाईल,” अशी भूमिका आधी जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती.
हेही वाचा : गेले अनेक वर्ष गणेश नाईक नवी मुंबईचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत : जितेंद्र आव्हाड
“उद्या ख्रिश्चन द्वेष वाढला म्हणून अमेरीकेने हे पाऊल उचलले तर…”
“जातीय धार्मिक विद्वेष पसरवून आपण देशाचे नुकसान करीत आहोत. याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहीजे. आज अरब लोकांनी पाऊल उचलले आहे. कारण आपल्या देशातील मुस्लीम द्वेष वाढतोय. उद्या ख्रिश्चन द्वेष वाढला म्हणून अमेरीकेने हे पाऊल उचलले तर काय होईल. देशाचे हित कशात आहे हे ध्यानात घ्यावे,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं होतं.
नेमकं प्रकरण काय आहे?
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अलीकडेच एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान कथितपणे प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यांच्या या टिप्पणीनंतर देशभरात पडसाद उमटले. उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली. यामध्ये १२ हून अधिकजण जखमी झाले आहेत. घटनेची तातडीने दखल घेतल्याने कानपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र आता संबंधित वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. वाढता विरोध पाहून भाजपाने काल भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.