स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या बदनामीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. मोठ्या राजकारण्यांविरोधात काही लिहिलं गेलं की तात्काळ कारवाई करणारे सायबर पोलीस मे महिन्यात सावित्रीबाई फुलेंच्या बदनामीची पोस्ट होऊनही अद्याप कारवाई करत नाहीत, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते गुरुवारी (२७ जुलै) पावसाळी अधिवेशनात बोलत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह लेख लिहिण्यात आले आणि काही अश्लील चित्रे टाकण्यात आले. यातून सावित्रीबाई या आमच्या आईला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. हा गुन्हा मेमध्ये घडला. आज जुलै महिना आहे.”

“सावित्रीबाईंविषयी आक्षेपार्ह लिहिणारा आरोपी का सापडत नाही?”

“मोठ्या राजकारण्यांविषयी काही लिहिलं गेलं की, २४ तासात सायबर पोलीस सक्रीय होतात आणि ते लिहिणाऱ्याला आकाश-पाताळ एक करून घेऊन येतात. मग सावित्रीबाईंविषयी इतकं आक्षेपार्ह लिहिल्यानंतर आजपर्यंत आरोपी का सापडत नाही?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी विचारला.

“दोषींवर सायबर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली?”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणारे असे कुठे लपून बसले आहेत, यावर सायबर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, तपास कुठपर्यंत गेला आहे? महापुरुषांबद्दल, महामानवांबद्दल नेहमीच उलट्यासुलट्या वेबसाईट्सवरून घाणेरडं लिहिलं जातं. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांबद्दल लिहिण्यात आलं होतं.”

हेही वाचा : “केवळ जाहिरातीच्या भरवशावर कुणीही घर घेऊ नये, कारण…”, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन

“समाज शांत आहे म्हणून पोलीस दुर्लक्ष करणार असतील, तर…”

“या आरोपींना पकडण्यात पोलीस कधीच यशस्वी झालेले नाहीत. समाज शांत आहे म्हणून पोलीस दुर्लक्ष करणार असतील, तर हा उद्रेक कधी ना कधी बाहेर पडेल. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला पाहिजे. सावित्रीबाई फुले माझ्यासह सगळ्यांच्या आई आहेत. त्या आईबद्दल भावना व्यक्त करून महाराष्ट्र पोलीस हे आरोपी कधी ताब्यात घेणार हे सांगावं,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सावित्रीबाईंच्या बदनामीवर सरकारला इशारा दिला.

Story img Loader