राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ७०,००० एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतल्याचा आरोप केलाय. तसेच यातून कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली असून एसटी संप कर्मचारी उपाशी आणि नेते तुपाशी असं म्हणत निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेण्यात आले. एकूण ७०,००० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली. ST संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी.”
“तुमची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले?”
दरम्यान, याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कामगारांच्या संपात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर हल्लाबोल केला होता. “कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.
संजय राऊत म्हणाले होते, “राज्य सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संपातून तोडगा काढण्यासाठी कामगारांना चांगली आर्थिक मदत मिळावी म्हणून पॅकेज जाहीर केलं. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कमीतकमी ५,००० रुपये पगारवाढ करणार आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार २४,००० रुपयांपर्यंत जाणार आहे. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे, तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय विरोधी पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं नुकसान करत आहेत.”
“त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”
“त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. मुंबई ही कामगार-शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाली आहे. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असा विचार आमचं सरकार कधीही करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांना आर्थिक मदत देत आहोत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं.
हेही वाचा : केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचा भाजपाचा आरोप, संजय राऊत म्हणतात दंगलखोर…
“कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले? तुम्ही चर्चा करू शकता, पण ज्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद भुषवलंय त्यांचा कामगारांसमोर, माध्यमांसमोर एकेरी उल्लेख करता. त्यांचं असं काय कर्तुत्व आणि योगदान आहे?” असा सवाल राऊतांनी विचारला होतं.