बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाची मोडतोड
ठाणे, खारेगाव टोलनाक्याच्या आसपास असलेल्या जमिनीचे संपादन होत असताना शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याची ओरड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी या भागातील बांधकमा व्यावसायिकाच्या कार्यालयाची समर्थक आणि प्रकल्पग्रस्तांसह मोडतोड केली. ठाणे महापालिकेने या विकासकाला अद्याप कोणत्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी दिली नसून संपादित केलेल्या जमिनीवर बांधकाम कार्यालय उभारण्याची तात्पुरती मंजुरी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी अद्याप कोणत्याही प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. तरीही होऊ घातलेल्या प्रकल्पात शेतक ऱ्यांना जमिनीचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असतानाच या आंदोलनात थेट आव्हाडांनी उडी घेतली.
ठाणे शहरात यापूर्वीही काही मोठय़ा विकासकांचे गृहप्रकल्प उभे राहिले असून त्यामध्येही शेतक ऱ्यांच्या मोबादल्याविषयीच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या प्रकल्पांची पायाभरणी होत असताना होणारी राजकीय आंदोलने पुढे कशी थंडावतात हे संबंधित शेतक ऱ्यांनी अनुभवले आहे. या पाश्र्वभूमीवर खारेगाव, ठाणे पट्टयात मॅरेथॉन ग्रुपने संपादित केलेल्या जमिनींच्या मुद्दय़ावरून जितेंद्र आव्हाडांनी शुक्रवारी केलेल्या तोडफोड आंदोलनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या काही जमिनी या महापालिका तसेच जिल्हाधिकारी विभागाच्या अखत्यारित येतात. यापैकी मॅरेथॉन ग्रुपने मोठय़ा प्रमाणावर
शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केल्याची चर्चा असून महापालिकेने अद्याप या भूखंडांवर कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पास परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी लहानगे कार्यालय उभारण्यात परवानगी देण्यात आली आहे. याच कार्यालयात शुक्रवारी काही आंदोलक शेतकऱ्यांसोबत घुसून आमदार आव्हाड यांनी मोडतोड केली.
संबंधित विकासकामार्फत मोठय़ा प्रमाणावर जमिनीचे संपादन होत असताना शेतक ऱ्यांना पुरेसा मोबदला दिला जात नसल्याचा आरोप यावेळी आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी केला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आव्हाडांसह १०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.