बांधकाम खात्यातील घोटाळ्यात छगन भुजबळ हे अडचणीत आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) चेहरा म्हणून जितेंद्र आव्हाड यांना पुढे आणण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केला आहे. सांगलीतील गोंधळप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आव्हाड यांचा उल्लेख ओबीसी समाजाचे लोकप्रिय आणि सुविद्य नेते, असा करून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जाते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना धुडगूस घालण्यात आला होता. तसेच आव्हाड यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. गेले दोन दिवस आव्हाड यांना धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आव्हाड यांना देण्यात आलेल्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात आव्हाड यांचे कौतुक करताना पवार यांनी, महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओ.बी.सी. समाजातील लोकप्रिय नेते आहेत, असा उल्लेख केला आहे. मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच विधानसभेतील जागृत सदस्य म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांची मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आपण नोंद घ्याल, अशी अपेक्षा पवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. ओबीसीतील लोकप्रिय व सुविद्य नेते, असा आव्हाडांचा उल्लेख शरद पवार यांनी मुद्दामहून केल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीने  ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांनाच  आतापर्यंत महत्त्व दिले. आता भुजबळांचे नाणे खणखणीत नसल्याने पक्षाने आव्हाड यांचे नेतृत्व पुढे केले आहे. इतर मागासवर्गीय समाजातील आव्हाड यांची अल्पसंख्याक समाजातही चांगली प्रतिमा आहे.
अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवीत असतात. पक्षाध्यक्ष पवार हे आव्हाड यांचे कौतुक करीत असले तरी राष्ट्रवादीमध्येच आव्हाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करणारी नेतेमंडळी आहेत. अगदी गेल्या आठवडय़ात आव्हाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ज्या पद्धतीने चिक्की फस्त केली, त्याबद्दल पक्षातच प्रतिक्रिया उमटली होती. अजित पवार तर आव्हाड यांना सुनावण्याची संधी सोडत नाहीत.
‘..हा तर देशाचा अपमान’
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यावरून निर्माण झालेल्या वादात काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनीही उडी घेतली आहे. इतिहासाचा विपर्यास्त करणाऱ्या पुरंदरे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देणे देशाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सिंग यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा