औटघटकेच्या परिवहन सभापतीपदासाठी फोडाफोडीचे राजकारण करत ठाणे शहरात राडा घालणाऱ्या येथील राजकीय नेत्यांना उशिरा का होईना लोकशाही मूल्यांची उपरती होऊ लागली आहे.
मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत आणि नैतिकतेच्या मोठय़ा बाता मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा शनिवारी केली. त्यामुळे उपमहापौरपदी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, पाटणकर यांचा राजीनामा जबरदस्तीने घेण्यात आला. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा. तसेच महापालिका मुख्यालयात दंगा करणाऱ्या दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी या वेळी केली.
दोन आठवडय़ांपूर्वी घेण्यात आलेल्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांचे प्रत्येकी एक सदस्य गळाला लावत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने युतीला दणका दिला.
फुटीरांनी धक्का दिल्यामुळे हादरलेल्या युतीच्या कार्यकर्त्यांनी याचा राग उपमहापौर िमलिंद पाटणकर यांच्यावर काढला. युतीच्या नेत्यांनी पाटणकर यांचा राजीनामा घेतला आणि त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले. गेल्या दोन आठवडय़ांपासून पाटणकर शिवसेना नेत्यांच्या नजरकैदेत आहेत. ठाणे महापालिकेत युतीकडे ६५ तर आघाडीकडे ६१ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात नगरसेवक तांत्रिकदृष्टय़ा आघाडीत सहभागी असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी राज ठाकरे कोणती भूमिका घेतील याचा नेम नसल्यामुळे आघाडीच्या गोटात एकंदरीत संभ्रमाचे वातावरण होते.
उपमहापौरपदाचा कार्यकाळ सहा महिने शिल्लक आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याऐवजी नैतिक मूल्यांची पेरणी करत आव्हाडांनी या निवडणुकीतून माघार घेण्याची खेळी खेळली, अशी चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा