नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा उत्सव! या दिवसांमध्ये अनेक जण आदिमाया, आदिशक्ती असलेल्या देवीचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील अनेक शक्तिपीठांपैकी एक असलेली विरारची जीवदानी देवी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते. केवळ वसई तालुक्यातच नव्हे, तर राज्यभरात या देवीची ख्यातकीर्त असून शेकडो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दररोज येत असतात.
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता स्थिरावली आहे. सतराव्या शतकापर्यंत येथे जीवधन नावाचा किल्ला अस्तित्वात होता. मात्र कालौघात त्याचे अस्तित्व नष्ट झाले. मात्र त्याच्या प्राचीन खुणा अजूनही शिल्लक आहेत. याच किल्ल्यावरील हे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. १९५६ मध्ये या मंदिरात देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि तेव्हापासून हे मंदिर भाविकांमध्ये प्रसिद्ध झाले.
तब्बल ९०० फूट उंचावर असलेल्या या मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरापासून या सिमेंट-काँक्रीटच्या पायऱ्या सुरू होतात. तब्बल १४०० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिराचा गाभारा पाच ते सहा फूट उंच पाषाणात खोदलेला आहे. आतमध्ये देवीची सुबक मूर्ती असून तिच्या डोईवर सुवर्ण मुकुट आहे. देवीची मूर्ती दगडात कोरलेली असून बाजूला त्रिशूळ आहे.
मंदिराला लागूनच अरुंदशी श्रीकृष्ण गुहा असून त्यालगत डोंगरात खोदलेले मोठे सभागृह आहे. या मंदिराच्या बाजूला कालिका माता, भरवनाथ, वाघोबा आदी देवतांची मंदिरे आहेत. मजल-दरमजल करत एक ते दीड तासांत आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. मात्र वर पोहोचल्यावर थंडगार हवा लागते आणि डोंगर चढल्याचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. मंदिराचा परिसर हिरव्यागार वनराईने नटलेला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि डोंगराच्या कपारीत तब्बल सात मजल्याची भव्य इमारत जीवदानी मंदिराचा साज घेऊन उभी आहे. विरार पूर्वेला कुठूनही या डोंगरावर नजर टाकल्यास ही भव्य इमारत आणि त्या बाजूला डोगरांवर रंगवलेला ‘ओम’ आपले लक्ष वेधून घेतो. तुंगा पर्वतरांगेच्या कुशीत वैतरणा नदीच्या काठी अनेक देवींची मंदिरे आहेत, मात्र त्यापैकी विरारच्या जीवदानीचे मंदिर अधिक प्रसिद्ध आहे. विरार हे नावही एकविरा या नावावरूनच पडल्याचे सांगण्यात येते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ासह गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी मंदिराच्या ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि काही भाविकांना पायऱ्या चढून एवढय़ा उंचावर जाणे जमत नसल्याने त्यांच्यासाठी रोप-वेची सोय आहे.
कसे जाल?
जीवदानी मंदिर, विरार
* पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकाहून जीवदानी मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. चर्चगेटहून विरारकडे जाण्यासाठी नेहमीच लोकल सुटतात.
* दिवा-कोपर स्थानकातून वसई रोड स्थानकाकडे जाणाऱ्या शटल सुटतात. तेथून विरारला जाता येते.