जे.जे. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे बाह्यरुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र आंतररुग्ण विभाग व शस्त्रक्रियागृहातील सेवेवर परिणाम झाला आहे.‘बोल मेरे भैय्या… हल्लाबोल’, ‘पेन्शन आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाची’, ‘हम सब एक है’, ‘कोण म्हणते देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाह”, ‘कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी सकाळपासून जे.जे. रुग्णालयात दणाणून सोडले.
हेही वाचा >>> मुंबई : एसटी कर्मचारी संघटना आंदोलनावर ठाम
सर्व कर्मचारी आंदाेलनात सहभागी झाल्याने बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, शस्त्रक्रियागृह आदी विभागांमध्ये एकही चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध नव्हता. बाह्यरुग्ण विभागामध्ये डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केल्याने आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र आंतररुग्ण विभागातील रुग्ण सेवेवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णालय परिसरात आणि रुग्ण कक्षातील सफाईवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. दाखल रुग्णांना विविध तपासण्यासाठी संबंधित विभागात घेऊन जाण्यासाठी कर्मचारी नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच त्यांना चाचण्यांसाठी घेऊन जावे लागले. रक्त तपासणीचे नमूने आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत हाेते. त्याचप्रमाणे लघुशस्त्रक्रियागृहामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांसाठी उपकरणांची सफाई करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने पुढील आठवड्यात बोलवण्यात आल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियागृहांमध्ये अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> ७/११चा बॉम्बस्फोट खटला : आरोपींच्या अपिलावर लवकरच सुनावणी – उच्च न्यायालय
रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावी, बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, बदली कामगारांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी जे.जे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जे.जे. रुग्णालयामध्ये १३५२ मंजूर खाटा असून, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची १२०० पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी ३५० पदे मागील १० वर्षांपासून रिक्त असून, ती भरण्यातच आलेली नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांना रुग्ण सेवा देताना असह्य ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना सुट्ट्या देखील घेता येत नाहीत. याचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याचे गांभीर्य लक्षात न घेता प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप जे. जे. रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी केला आहे.