लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावीत, बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा, बदली कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी जे.जे. रुग्णालयातील कर्मचारी ३ जुलैपासून बेमुदत संप पुकारणार आहेत. या बेमुदत संपामुळे बाधित होणाऱ्या रुग्णसेवेसाठी सरकार व रुग्णालय प्रशासन जबाबदार असेल, असे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

जे. जे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतू रुग्णसेवा व देखभालीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यातही कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. सध्या जे.जे. रुग्णालयामध्ये १३५२ मंजूर खाटा आहेत. मात्र मागील १० वर्षापासून रिक्त पदे भरली न गेल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवरील सरळ सेवेने भरती न झाल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देताना असह्य ताण सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांना स्वतःच्या सुट्ट्याही घेता येत नाहीत, यासर्व बाबीचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

आणखी वाचा-बनावट व्हिसा प्रकरण : आणखी एका नौदल अधिकाऱ्यासह चौघांना अटक

कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून याबाबत वारंवार निवेदने देऊनही भरतीबाबत प्रशासन वेळ काढू धोरण राबवत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कामगारांची रिक्त जागेवरील सरळसेवेने भरती प्रक्रिया करण्याबाबत प्रशासनाच्या वेळकाढू धोरण राबवत आहे. त्यामुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी यापूर्वी स्थगित केलेले ‘काम बंद असहकार आंदोलन’ ३ जुलै २०२४ पासून करतील असा इशारा जे जे रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा रेणोसे यांनी दिला आहे. या बेमुदत संपामुळे रुग्णसेवा बाधित होण्याची शक्यता असून, याची सर्व जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची असेल, असे संघटनेचे सरचिटणीस सत्यवान सावंत यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jj hospital employees on indefinite strike from july 3 mumabai print news mrj
Show comments