गेल्या दीड शतकाहून अधिक काळ लाखो रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या आणि उत्तम डॉक्टर घडविणाऱ्या शासनाच्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालयाचा आगामी वर्षांत संपूर्ण कायापालट होणार आहे. तब्बल ८८१ कोटी रुपये खर्चून हायटेक मल्टी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात जे.जे.चे रुपांतर होणार असून याचा फायदा कर्करोग, मूत्रपिंड विकार, मेंदूसह अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांना होणार आहे.
गेल्या काही दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे गंभीर आजारांवरही अत्याधुनिक उपचार उपलब्घ झाले आहेत. तथापि हे उपचार प्रामुख्याने खाजगी पंचतारांकित रुग्णालयात उपलब्ध असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. या पाश्र्वभूमीवर जे.जे. रुग्णालयातील वाडिया नर्सिग होस्टल आणि लहानमुलांच्या विभागाची जागा पाडून तेथे दहा मजली हायटेक रुग्णालयाची इमारत बांधण्यास येत्या मार्चपासून सुरुवात होणार असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते व विख्यात नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. या नवीन इमारतीत एकूण ११०० बेड असून यातील २०० आसीयू व एनआयसीयूसाठी असणार आहेत. पन्नास बेडचे स्वतंत्र डायलिसीस केंद्रही असेल. हार्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी स्वतंत्र व्यवस्था, तीन एमआरआय व तीन सिटी स्कॅन मशिन तसेच कॅन्सरसाठी पेट स्कॅनसह अत्याधुनिक निदान केंद्र उभारण्यात येणार आहे. बाह्य़ रुग्ण विभागात प्रत्येक प्रत्येक विशेष सेवेसाठी व्यवस्था करण्यात आली असून त्यालगत तपासणी व तात्काळ उपचारासाठी साठ खाटांची व्यवस्था असणार आहे.
या रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर एकूण २१ शस्त्रक्रिया गृह असणार आहेत. २५० खाटांचे नर्सिग होम, शंभर खाटांचा बर्न विभाग तसेच दोनशे लोक बसू शकतील अशा सुसज्ज ऑडिटोरियमची व्यवस्था या इमारतीत केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकने असलेले, सर्वार्थाने अत्याधुनिक व स्वयंचलित असे न्युमॅटिक सुटची व्यवस्था असलेले हे देशातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरेल, असा विश्वास डॉ. लहाने यांनी व्यक्त केला. या इमारतीच्या उभारणीसाठी सध्याचे वाडिया नर्सिग होम आणि पेडियाट्रिक वॉर्डची जागा पाडण्याचे काम जानेवारीपासून सुरु करण्यात येणार असून मार्चमध्ये नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल. यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर बांधकामासाठी निविदा मागविण्यात येणार असून सध्याच्या जे.जे.मधील रुग्णालयाच्या इमारतीत सामान्य रुग्णांवर उपचार केले जातील.
वर्षांला ३२ हजार शस्त्रक्रिया
अतिविशेष सेवा रुग्णालय व विद्यमान रुग्णालयात मिळून एकूण २४५० बेड असल्यामुळे प्रभावीपणे उपचार करणे शक्य होणार आहे. डॉ. लहाने यांनी अधिष्ठाता म्हणून पदभार घेण्यापूर्वी जे.जे. रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात वर्षांकाठी साडेचार लाख रुग्णांवर उपचार केले जात आज हीच संख्या
साडेनऊ लाखाच्या घरात आहे तर पूर्वी होणाऱ्या शस्त्रक्रियेच्या १६ हजार संख्येत वाढ होऊन सध्या वर्षांकाठी ३२ हजार शस्त्रक्रिया केल्या जातात.