कुलदीप घायवट, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : देशभरात रोजगार मेळाव्यातून हजारो उमेदवारांना नियुक्ती देण्याचे शासकीय कार्यक्रम गाजत असताना प्रत्यक्षात अनेक अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागात हा प्रकार केला आहे. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगून देशभरात रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुण या मेळाव्यांकडे आशेने पाहात आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

अर्ज, मुलाखती, नियुक्ती पत्रे असे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या लाखो तरूणांपैकी काही हजारांनाच प्रत्यक्ष नोकरी मिळते. त्यातही हक्काची, हमखास नियुक्ती मिळणाऱ्या तरूणांनाही रोजगार मेळाव्यातून नोकरी मिळाल्याचे दाखवण्यात येत आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागात घेतलेल्या रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारांतर्गत काढलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रेल्वे मेळ्यांतर्गत एकूण ९०४ जणांना भरती केले आहे. रोजगार मेळ्याव्यात एकूण ४२ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली आहे. महापदी यांनी यावेळी महाराष्ट्रातील किती जणांना भरती केली, याची माहिती विचारली असता, माहिती अधिकार कायद्या अंतर्गत ही माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : भुयारी मेट्रो ३ प्रवासादरम्यान मिळणार अखंडीत मोबाईल सेवा

बेरोजगार तरुणांना आणि रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या तरूणांसाठी रोजगार मेळावा सुरू केला होता. याद्वारे देशातील रेल्वेच्या विविधात तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनिअर ड्राफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्रोफेसर, शिक्षक, यांसारखी पदे तसेच ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षा अधिकारी, पीए, एमटीएस आणि इतरांना यामध्ये सामील केले जाणार असल्याची माहिती एप्रिल २०२३ मध्ये मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती.

रेल्वेतील कर्मचाऱ्याचा कार्यकाळात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येते. वर्षानुवर्षे अशी नोकरी दिली जाते. मात्र, अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर लागलेल्या नोकरदाराला रोजगार मेळाव्यातून लागल्याची जाहिरात करण्यात येत आहे. – वेणू नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job on compassionate grounds appointment letter given in job fair mumbai print news zws