मुंबई : जोगेश्वरीतील आमदार रविंद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला तरी जोगेश्वरीतील शिवसैनिक पदाधिकारी मात्र ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोगेश्वरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोकणातील चाकरमान्यांची मोठी संख्या असलेला हा भाग कायम शिवसेनेसोबत असतो. मात्र शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर या भागातील माजी नगरसेवक देखील एक एक करत बाहेर पडले व शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामध्ये माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सदानंद वामन परब, रेखा रामवंशी यांनी आधीच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी देखील अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले नव्हते. त्यातच गेल्या रविवारी आमदार रविंद्र वायकर यांनी देखील ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर कोणकोण जाणार याबाबत उत्सुकता होती. मात्र ठाकरे गटातील उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख हे ठाकरे यांच्यासोबतच आहेत. जोगेश्वरी भागात आरे वसाहतीचा भाग येतो. या भागातील माजी नगरसेवक जितेंद्र वळवी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तेथील सामान्य कार्यकर्तेही अजून ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यांच्या मतांचा आम्ही आदर करतो असे मत शिवसेनेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक अनंत नर यांनी सांगितले.

हेही वाचा – गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका

अमोल किर्तीकर यांचा प्रचार

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम विभागासाठी अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे या भागातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आता अमोल कीर्तिकर यांच्या प्रचाराचे काम सुरु केले आहे.

दरम्यान, वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांना आता लोकसभेला किंवा विधानसभेला उमेदवारी देणार का याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. मात्र याआधीच प्रवीण शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी कबूल केल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा – सांगलीसाठी आघाडीतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी कॉंग्रेसचा दबाव

दरम्यान, आमदार वायकर यांनी एकट्यानेच प्रवेश केल्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आहे का अशीही चर्चा सुरु आहे. मात्र वायकर धनुष्य बाण चिन्हावर निवडून आले होते व त्यांना शिंदे शिवसेनेचा व्हीप लागू होतो त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात नाही, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. पालिका मुख्यालयात एका कार्यक्रमासाठी आले असता प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना ते बोलत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jogeshwari shivsainik in thackeray group even after ravindra waikar left the party uddhav thackeray dominance in jogeshwari mumbai print news ssb