मुंबईतील माटुंग्याच्या नानालाल मेहता उड्डाणपुलाखालील उद्यान आणि जॉगिंग ट्रॅकला मिळणारा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पाहता अशा प्रकारचा प्रकल्प दादर टीटी येथील नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखालीही राबविण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत. नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखाली आसऱ्याला असणारे गर्दुले आणि घाणीमुळे येथील रहिवाशीही त्रस्त आहेत. त्यामुळे, माटुंग्याप्रमाणे इथेही उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक आल्यास हे चित्र पालटेल, असे रहिवाशांना वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील महेश्वरी उद्यानाच्या अलीकडे नानालाल मेहता उड्डाणपुलाखाली पालिकेने पाच कोटी खर्च करुन जे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक बांधला आहे. मुंबईतील अशा प्रकारचे हे पहिलेच उद्यान आहे. त्याचा येथील रहिवाशी पुरेपुर वापर करत आहेत. एरवी अनधिकृत वाहनतळ म्हणून वापरण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाखालील जागेवर अशा प्रकारचे उद्यान बांधण्याचा मुंबईतील हा पहिलाच प्रयोग आहे.
या उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक निर्मितीच्या आधी मांटुगावासीयांना वडाळ्याच्या पाच उद्यान्यात पहाटेच्या प्रभातफेरीसाठी जावे लागत होते. आता उड्डाणपुलाखालील हे उद्यान आम्हाला अधिक सोयीचे होते आहे. तसेच पावसाळ्यात पुलाचा आसरा असल्याने पावसाळ्यातही आमच्या चालण्यात खंड पडत नाही, असे इथल्या उड्डाणपुलाखाली फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या संपदा जोशी यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना सांगितले.
याच पाश्र्वभूमीवर आता दादर टीटीकडील रहिवाशीही नाना शंकरशेठ उड्डाणपुलाखाली अशाच प्रकारचे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक बांधण्याची मागणी करीत आहेत. इथल्या पुलाखाली सध्या घाणीचे साम्राज्य आहे. खोदादाद सर्कलकडील पुलाखालच्या भागात तर पादचाऱ्यांकडून मलमूत्र विसर्जन होत असल्याने त्या भागात दुर्गधीचे वातावरण आहे. तसेच दादर रेल्वे स्थानकाकडे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांनाही तेथे आश्रयाला असणाऱ्या गर्दुल्यांमधून वाट काढत जावे लागते. काहींनी तर तेथेच आपले संसार उभारलेले आहेत. यावर उपाय म्हणून उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक शक्य नसल्यास किमान तिथे स्वच्छता अथवा सुशोभिकरण करावे असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
माटुंगा पुलाप्रमाणे शंकरशेठ पुलाखालीही उद्यान आणि ट्रॅक व्हायला हवा. या जागेत बरेच मद्यपी धिंगाणा घालतात. अनधिकृतपणे इथेच राहतात. तसेच येणारे-जाणारे आमच्या इमारतीसमोरच्या पुलाखालील भागात मलमूत्र करतात. हे प्रकार बंद करून पालिकेने या भागाच्या सुशोभिकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा.
– सौरभ देवघरकर, स्थानिक रहिवाशी