सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदारसंघात तर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मतदारांचे खिसे गरम करण्याआधी पत्रकारांचे हात ओले करण्याची चढाओढ लागली आहे. सर्वाकडून निरपेक्ष भावनेने ‘दौलतजादा’ स्वीकारणाऱ्या या बातमीदारांच्या लेखण्या आता त्यांच्या त्यांच्या वृत्तपत्रांतून नेमक्या कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात चालणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे.  
मावळ मतदारसंघातील तिन्ही प्रमुख उमेदवार पनवेल, उरणसाठी नवखे आहेत. त्यामुळे अल्पावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे माध्यमांना किंवा त्यांच्या स्थानिक प्रतिनिधींना हाताशी धरण्याचे खुलेआम प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीनिमित्ताने येथे आयोजित करण्यात येत असलेल्या पत्रकार परिषदांमधून हे दिसून येत आहे. सामान्यत: पत्रकार परिषदांमध्ये चहापाणी, नाश्ता, जेवण आणि ‘पेवन’ यांचीही सोय केली जाते. पण पनवेलमधील पत्रकार परिषदांमध्ये वेगळेच चित्र दिसते. तेथील परिषद म्हणजे वार्ताहरांसाठी उत्पन्न आणि पाटर्य़ाचा विषय बनला आहे. तेथे वाटली जाणारी पाकिटे घेण्यासाठी पनवेलसोबत नवी मुंबईच्या पत्रकारांचीही गर्दी जमत आहे. त्यामुळे ‘आमचा वाटा नवी मुंबईचे पत्रकार मारतात’ अशी ओरडही पनवेलमधील काही पत्रकारांमध्ये सुरू आहे.
हिशेब पाकिटांचा
पनवेल, रायगडमध्ये मोठे प्राबल्य असलेल्या एका पक्षाच्या ‘भाऊं’ची पत्रकार परिषद नुकतीच खारघरमध्ये झाली. तेथे निमंत्रितांसोबतच ‘आगंतुक’ पत्रकारांचीही गर्दी झाली. प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे ५० प्रतिनिधी तेथे उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे तर दिलीच, पण त्याचबरोबर काही इष्टपत्रकार आणि परिवाराला प्रत्येकी पाच हजारांचा ‘अहेर’ही दिला. या बडय़ा पक्षाचा आत्तापर्यंतचा भिडू असलेल्या मोठय़ा पक्षाच्या उमेदवारानेही तीन हजार रुपयांची पाकिटे वाटून पत्रकारांचे आशीर्वाद पदरात पाडून घेतले. या दोन्ही पक्षांची पाकिटे मिळाल्यानंतर  सत्ताधारी पक्षानेही पनवेलमधील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. या वेळीही पत्रकारांची तेथे गर्दी केली. गोपनीय विभागाचे पोलीसही धडकले. त्यामुळे पाकीट हातचे जाते की काय या भयाने अनेकांच्या लेखण्या थरथरल्या. परंतु थोडय़ा वेळाने पोलीस चालते झाले आणि तमाम बातमीदारांवर पाच हजार रुपयांची दौलतजादा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा