आजचा दिवस माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. कसाबच्या खटल्याद्वारे दहशतवादाविरुद्ध लढाई जिंकल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कनिष्ठ व उच्च न्यायालयात पोलिसांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.
मी केवळ कसाब या एका दहशतवाद्याविरुद्ध कायद्याची लढाई लढलेलो नाही. ती लढताना कोटय़वधी भारतीय माझ्याशी अप्रत्यक्षपणे जोडलेले होते. हल्ला मुंबईवर झाला, असला तरी कोटय़वधी भारतीयांच्या हृदयावर जखम झाली होती. त्यामुळेच हा खटला केवळ कसाबविरुद्ध नव्हता तर त्याच्या मागे जी दहशतवादी संघटना होती, त्यांच्याविरुद्धचा होता. आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर करण्याची कठीण जबाबदारी माझ्यावर आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांवर होती. कसाबला आज फासावर चढवून भारताने जगाला कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे, हे दाखवून दिले आहे. कसाबच्या फाशीवर तत्परतेने झालेल्या अंमलबजावणीने त्याच्या हल्ल्यात मारले गेलेल्या शेकडोजणांच्या आप्तांना अल्पसा का होईना न्याय मिळाला आहे. कसाबबाबतच्या न्यायालयीन निर्णयातून पाकिस्तानकडून दहशतवाद भारतात निर्यात केला जातो आणि येथील सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहे, हेसुद्धा जगाला, विशेषत: अमेरिकेला दाखवून देण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असे त्यांनी सांगितले.  
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबच्या फाशीचा अर्ज फेटाळण्याबाबत जी तत्परता दाखविली आहे. तीच तत्परता त्यांनी फाशीची शिक्षा झालेल्या अन्य दहशतवाद्यांबाबतही दाखवावी. कसाबला फाशीपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय हे गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त आयुक्त देवेन भारती, मुख्य तपास अधिकारी रमेश महाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते. त्यांच्या कठोर मेहनतीमुळेच पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यात भारताला यश आले. असे निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.     
फाशी गुप्तता का ?
अतिशय गोपनीयता ठेवून अजमल कसाबला देण्यात आलेल्या फाशीबाबत त्याच्यासाठी उच्च न्यायालयात बाजू लढविणारे अॅड्. अमीन सोलकर, अॅड्. फरहाना शाह यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कसाबच्या फाशीबाबत एवढी गोपनीयता ठेवण्याचे कारण काय, असा सवाल त्याच्या वकिलांनी उपस्थित केला आहे. कसाबला फाशी देण्याच्या तडकाफडकी निर्णयाने आपण अवाक झालो आहोत. खूप वेळ त्याला सुरक्षित वातावरणात ठेवणे कठीण असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे जरी मान्य केले, तरी फाशीबाबत गोपनीयता का, याकडे सोलकर यांनी लक्ष वेधले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. हा खटला अपवादात्मक असल्यानेच सरकारने कसाबच्या दयेचा अर्ज तत्परतेने फेटाळला. या खटल्याला जागतिक पातळीवरही महत्त्व आहे. कसाबला फाशी कधी देणार, असा सवाल लोक सतत करत होते. त्याच्या फाशीने लोकांना आणि यात बळी पडलेल्यांना न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया कनिष्ठ न्यायालयात कसाबची बाजू लढविणारे अॅड्. अब्बास काझ्मी यांनी व्यक्त केली.
‘हा तर भारतीय कायद्याचा विजय ’
भारतीय कायद्याचा विजय आहे. कसाबला फाशी दिली याचा आनंद झाला असे मी नाही म्हणणार. कारण भारतीय कायद्याने आरोपी अन्य देशातील असला तरी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिल्याचे दाखवून दिले आहे. त्या परंपरेला धरुनच कसाबचा खटला चालविण्यात आला. तसेच त्याच्या माध्यमातून त्याचा भारतीय कायद्याने दाखवून दिले आहे की, भारतीय लोकशाही सक्षम, सुदृढ अशी लोकशाही आहे आणि त्याच्याच जोरावर दहशतवादाचा बिमोड करू शकते. के. पी. पवार, कसाबचे वकील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा