सरकार आणि पोलिसांनी एकत्र बसून आत्मपरीक्षण करावे
‘पोलिसांना मारहाण ही गेल्या काही दिवसांमधील दररोजच्या वर्तमानपत्रातील बातमीच झाली आहे. पोलिसांवरील हल्ले किंवा मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे. आम्ही सेवेत असताना पोलिसांवर हात उगारण्याची कोणाची िहमत होत नसे. एखाद-दुसरी अपवादाने तशी घटना घडलीच तर कठोर कारवाई केली जायची. अलीकडे तर वारंवार असे प्रकार घडत आहेत. महिला पोलीसही यातून सुटलेल्या नाहीत. या पाश्र्वभूमीवर पोलिसांवरील हल्ले का वाढले याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र बसून याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. नेमके कोण आणि कुठे चुकते याचे विश्लेषण झाले पाहिजे. लोकांचा पोलीस यंत्रणेवरील धाक कमी झाला आहे हे या हल्ल्यांमधून स्पष्ट होते. आपले कोणी वाकडे करू शकत नाही किंवा आपण काहीही केले तरी वर्षांनुवर्षे खटला चालतो आणि पुढे काहीच निष्पन्न होत नाही, हा चुकीचा संदेश बाहेर गेला आहे. कायद्याचा धाक सामान्यांना राहिलेला नसावा. पोलिसांवर हात उगारणारे केवळ एकाच वर्गातील नाहीत तर समाजातील धनाढय़ सुद्धा आहेत. राजकीय हस्तक्षेप हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सारे माफ असते, असा समज दृढ झाला. त्यातूनच सत्ताधारी मंडळी जास्तच आक्रमक होतात. हे फक्त मुंबई किंवा राज्यात नाही, तर देशातील सर्व राज्यांमध्ये हे चित्र आहे. सत्ताधारी किंवा राज्यकर्त्यांनी हे चित्र जाणीवपूर्वक बदलायला पाहिजे. कायदा सर्वाना समान असतो, हे वास्तव प्रत्यक्षात आले पाहिजे.
पोलीस दलातील भ्रष्टाचाराला दोष दिला जातो. भ्रष्टाचार होत असल्यास त्याला आळा घालण्याचे काम हे वरिष्ठांचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल अलीकडे तक्रारी ऐकू येतात. अशा वेळी सरकारने ठोस उपाय योजणे आवश्यक आहे.
पोलिसांच्या मारहाणीचे प्रकार वारंवार घडत असल्यास सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. कायदा हातात घेण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असा धाक निर्माण झाला पाहिजे. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास असे हल्ले किंवा मारहाणीच्या प्रकार सुरूच राहतील. पोलिसांचे महत्त्व कमी होणे किंवा त्यांचा धाक नसल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्यास वेळ लागणार नाही.
परिणामी अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलिसांना होणारी मारहाण किंवा हल्ले वेळीच थांबले पाहिजेत.’
- ’ नेमके कोण आणि कुठे चुकते याचे विश्लेषण झाले पाहिजे
- ’ लोकांचा पोलीस यंत्रणेवरील धाक कमी झाला आहे हे या हल्ल्यांमधून स्पष्ट होते
- ’ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल तक्रारी येतात
- ’ अशा वेळी सरकारने ठोस उपाय योजणे आवश्यक आहे.
- ’ पोलिसांवर हात उगारणारे केवळ एकाच वर्गातील नाहीत तर समाजातील धनाढय़ सुद्धा आहेत
- ’ राजकीय हस्तक्षेप हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना सारे माफ असते, असा समज दृढ झालाय
- ’ त्यातूनच सत्ताधारी मंडळी जास्तच आक्रमक होतात
- ’ फक्त मुंबई किंवा राज्यात नाही, तर देशातील सर्व राज्यांमध्ये हे चित्र आहे
(शब्दांकन : संतोष प्रधान)