मुंबई : कोळशाच्या दरवाढीचा आणि उन्हाळय़ातील महाग विजेचा वाढीव खरेदीखर्च समायोजन आकारातून वसूल करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्यामुळे जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिने राज्यातील वीजग्राहकांना दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.    

या महिन्यापासून महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांवर ६५ पैसे ते २.३५ रुपये प्रति युनिट, अदानीच्या ग्राहकांवर सरासरी ९२ पैसे प्रति युनिट, तर टाटाच्या वीज ग्राहकांवर सरासरी १.०५ रुपये पैसे प्रति युनिट असा बोजा पडणार आहे. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांसाठी ही वाढ लागू असेल. कोळशाचे वाढलेले दर आणि उन्हाळय़ातील वीजटंचाईच्या काळात भारनियमन टाळण्यासाठी खरेदी केलेली महाग वीज हा वाढीव खर्च इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वसूल करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्याने चालू महिन्यापासूनच वीजदरवाढ लागू करण्यात आली आहे.  

विजेची मागणी आणि वीजपुरवठय़ाचा दर यांचा आराखडा तयार करून राज्य वीज नियामक आयोगामार्फत वार्षिक वीजदर निश्चित करण्यात येतो. मात्र काही वेळा वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळशाच्या खर्चात आकस्मिक वाढ होते. तर काही वेळा वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महाग वीज खरेदी करण्याची वेळ येते. अशा वेळी या वाढीव खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार लागू करून तो खर्च वसूल केला जातो. गेल्या चार महिन्यांत आयात कोळशाचे दर अचानक मोठय़ा प्रमाणात वाढले. तसेच देशभरात वीजटंचाई निर्माण होऊन बाजारपेठेतील विजेचे दर तिप्पट -चौपट झाले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून मुंबई आणि उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीसह राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणला इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून वाढीव खर्च वसूल करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा कोळशावरील वाढीव खर्च, उन्हाळय़ात भार नियमन टाळण्यासाठी घेतलेल्या महाग विजेचा सुमारे पाच हजार कोटींचा खर्च इंधन समायोजन आकारातून वसूल केला जाणार आहे.

मुंबईतील वीज ग्राहकांकडून चार महिन्यांत इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून ३६२ कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत. मुंबईतील ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी खुल्या बाजारातून अल्पकालीन कराराद्वारे खरेदी केलेल्या महाग विजेचा हा बोजा आहे. सरासरी ९२ पैसे प्रति युनिट असा बोजा अदानीच्या ग्राहकांवर पडणार आहे.

मुंबईतील टाटा पॉवरच्या ग्राहकांना सरासरी एक रुपया पाच पैसे प्रति युनिट असा इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. आयात कोळशावरील वाढीव खर्चामुळे वीजनिर्मिती खर्चात झालेली वाढ वसूल करण्यासाठी हा इंधन समायोजन आकार लागू करण्यात आला आहे. इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून एकूण किती कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल करण्यात येणार आहेत, याची माहिती महावितरण आणि अदानी पॉवरने दिली. टाटा पॉवरने मात्र ही माहिती दिली नाही.

महावितरणचे औद्योगिक ग्राहक..

महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट एक रुपया ते एक रुपया पस्तीस पैसे असा इंधन समायोजन आकार लागू होणार आहे. तर रेल्वे मेट्रो, मोनो रेल्वे यासाठी ८० पैसे ते एक रुपया ३५ पैसे प्रति युनिट इंधन समायोजन आकार असेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा पाच महिन्यांत हा इंधन समायोजन आकार वसूल केला जाणार आहे.

सरासरी दरभार?

’महावितरणच्या घरगुती वीज ग्राहकांवर ६५ पैसे ते २.३५ रुपये प्रति युनिट

’अदानीच्या ग्राहकांवर सरासरी ९२ पैसे प्रति युनिट

’टाटाच्या ग्राहकांवर सरासरी १.०५ रुपये पैसे प्रति युनिट

महावितरणचे घरगुती ग्राहक (प्रति युनिट)

’महावितरणच्या ग्राहकांना दरमहा १०० युनिटपर्यंत ६५ पैसे.  

’दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना १.४५ रुपये.

’५०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २.०५ रुपये.

’५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना २.३५ रुपये. 

Story img Loader