‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या निकालातील घोळ
गेली पाच वर्षे पेपरफुटी, लांबणारे निकाल, त्यातले घोळ यामुळे सतत चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार दुर्दैवाने नव्या कुलगुरूंच्या काळातही सुधारलेला नाही. आता ‘तृतीय वर्ष कला शाखे’च्या (टीवायबीए) एप्रिल, २०१५मध्ये झालेल्या पाचव्या सत्राच्या अख्ख्या निकालाचेच चुकीचे ‘क्रेडिट’ दिले गेल्याने पार ‘निक्काल’ लागला आहे. गंभीर बाब म्हणजे ही चूक विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून देईपर्यंत विद्यापीठाच्या लक्षातही आली नव्हती. त्यामुळे, गेल्या वर्षी जुलैमध्ये जाहीर झालेल्या निकालातील चुकांची पाळेमुळे शोधण्याचे काम परीक्षा विभागाने आता जानेवारीत सुरू केले आहे. अर्थात या घोळाचा फटका बसलेल्या अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालातील त्रुटी विद्यापीठ कशा व कधी दूर करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
एप्रिल, २०१५मध्ये झालेली ही परीक्षा ‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या पुनर्परीक्षार्थीकरिता घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधीतरी जुलै-ऑगस्टमध्ये ऑनलाइन जाहीर करण्यात आला. परंतु, ‘श्रेणीआधारित मूल्यांकन पद्धती’नुसार संगणकावर निकाल तयार करताना चुकीचे ‘क्रेडिट’ दिले गेल्याने निकालातच घोळ झाला. प्रत्येक पेपरचे क्रेडिट वेगळे असतात. क्रेडिट चुकीचे दिल्यास संपूर्ण निकालच चुकतो.
‘पेपर क्रमांक ९’ करिता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एकच क्रेडिट दिले गेल्याने हा घोळ झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे. आम्ही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर या गोंधळाला नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित होईल,’ असे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले.
टीवायबीएच्या भूगोल, इतिहास, गणित, राज्यशास्त्र, मानसशास्त्र अशा सर्वच विषयांमध्ये पेपर ९ आहे. त्यामुळे, पेपर क्रमांक ९ असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या चुकीचा फटका बसल्याची शक्यता आहे. परीक्षा नियंत्रकांच्या म्हणण्याप्रमाणे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांच्या निकालात यामुळे गडबड झाल्याची शक्यता आहे.
घोळ लक्षात येऊनही..
महत्त्वाचे म्हणजे निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी निकालाची तपासणी करताना परीक्षा विभागातील एका अधिकाऱ्याच्या लक्षात हा घोळ आला. त्यांनी संपूर्ण निकालच मागे घेऊन नव्याने तयार करून जाहीर करण्यास सांगितले. परंतु, तेव्हा त्यांच्या सूचनेकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे, हा सदोष निकाल अजूनपर्यंत कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या आठवडय़ात एका विद्यार्थ्यांने परीक्षा विभागाच्या लक्षात हा घोळ आणून दिला तेव्हा कुठे हा घोळ निस्तरण्याचे काम सुरू झाले.
नेमका घोळ काय?
विद्यार्थ्यांचे वर्षांच्या शेवटी होणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारे मूल्यमापन करण्याऐवजी त्याच्या पदवीच्या तीनही वर्षांतील शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन सर्वसमावेशक मूल्यमापन व्हावे यासाठी श्रेयांक-श्रेणी पद्धती लागू केली गेली. त्यातले क्रेडिट म्हणजे एखाद्या पेपरचे आठवडय़ाचे घेतले जाणारे तास. साधारणपणे एका विषयाचे सहा पेपर विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. त्यातल्या प्रत्येक पेपरसाठी आठवडय़ाला जितक्या तासिका घेतल्या जातात त्याच्याशी त्या पेपरच्या ग्रेडशी म्हणजे श्रेणीशी गुणायचे. ही ग्रेड त्या विषयाच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांला किती गुण मिळाले यावर ठरते. (उदाहरणार्थ ६० ते ७५ दरम्यान गुण असतील तर ग्रेड झाली सहा) क्रेडिट आणि ग्रेडच्या गुणाकारातून विद्यार्थ्यांचा ‘ग्रेड पॉइंट’ बनतो. याप्रमाणे सगळ्या पेपरांच्या ग्रेड पॉइंटची बेरीज करायची आणि त्याला सर्व पेपरच्या क्रेडिटच्या येणाऱ्या बेरजेने भागायचे आणि त्यानंतर येणारी संख्या म्हणजे एसजीपीए (सेमिस्टर ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज). अशी सहाही सत्रांची एसजीपीएची बेरीज करायची आणि येणाऱ्या संख्येला एकूण सत्रांनी (सहा किंवा आठ) भागायचे. त्यानंतर जी काही संख्या येईल त्याची सरासरी काढली की तो विद्यार्थ्यांचा ‘क्युमिलेटिव्ह ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज’ (सीजीपीए) बनतो. थोडक्यात, एका पेपरचे क्रेडिट चुकीचे दिले गेल्याने विद्यार्थ्यांचा तीनही वर्षांचा निकाल सदोष ठरतो.