मुंबई : रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होऊ लागले असून जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवरी मेट्रो ७’वर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप या मार्गिकांवर मेट्रोच्या फेऱ्या वाढविलेल्या नाहीत. दरम्यान, मागणी लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात येतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) उच्चपदस्थांनी स्पष्ट केले.
तांत्रिक कामानिमित्त मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात ३० मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता ३६ तासांच्या जम्बो ब्लॉकला सुरुवात झाली. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊन प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक प्रवासी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवरी मेट्रो ७’चा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्यापही ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवरी मेट्रो ७’वरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>>“योग्य वेळी अटक न केल्याने मोदी, मल्ल्या आणि चोक्सी पळून गेले”, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सुनावलं
दरम्यान, रेल्वेच्या जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’, ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवरी मेट्रो ७’वरील प्रवासी संख्येत शुक्रवारी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची वाढणारी संख्या आणि मागणी लक्षात घेऊन ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’वरील फेऱ्यांमध्ये एमएमआरडीएतर्फे वाढ करण्यात येईल, अशी माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
हेही वाचा >>>१२ वर्षांनंतरही गहाळ १,४०१ नस्तींचे प्रकरण गुलदस्त्यातच
मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या नियोजनासाठी बराच वेळ लागतो. मात्र रेल्वे प्रशासनाने जम्बो ब्लॉकची माहिती अचानक दिली. इतक्या मोठ्या जम्बो ब्लॉकची घोषणा काही दिवस आधी करायला हवी होती. तसे झाले असते तर इतर यंत्रणांना तयारी करता आली असती, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनेही (एमएमओपीएल) अद्याप फेऱ्या वाढविण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.